मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Tuesday, April 23, 2019

वाचन संस्कृती कशी वाढेल.-- आपटे वाचनालय इचलकरंजी स्मरणिकेसाठी


21/4/2019
आपटे वाचनालय इचलकरंजी स्मरणिकेसाठी
वाचन संस्कृती कशी वाढेल.
" मी पुस्तके चाऊन चाऊन वाचतो, ” खूप वर्षांपूर्वी एका नुकत्याच ओळख झालेल्या व्यक्तिने मला हे वाक्य सांगितले होते. आमची ओळखही त्यांच्या लेखनप्रतिभेमुळे, विशेषतः लेखनातील सुस्पष्ट विचारांमुळे झाली होती. ते कुणी मोठे लेखक वगैरे नव्हते – आताही नाहीत, पण विचारांची सुस्पष्टता आजही जाणवते. म्हणूनच की काय, एखादे नवे पुस्तक वाचायला घेतले की वरील वाक्य हमखास आठवते.
असाच दुसरा प्रसंग – एक सरपंच – लौकिकदृष्ट्या शालेय शिक्षणही पूर्ण न केलेले, पण विकासाची प्रगल्भ दृष्टि असलेले. त्यांच्या घरी चहाला गेलेली असताना हॉलमधील लांबच्या कोपऱ्यात बसून एक तरूण अत्यंत मंद आवाजातील रेडियो ऐकत होता. मी आवाज मोठा करायला सांगितल्यावर सरपंच म्हणाले – चला आपण तिथे जाऊन रेडियो ऐकू. माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नवाचक चिन्ह पाहून पुढे म्हणाले – रेडियो ऐकायचा असेल तर बारीक आवाज ठेऊन व पूर्ण लक्ष देऊन रेडियो ऐका अशी शिस्त मी घरात लावलेली आहे. रेडियोचा बदाबदा आवाज आपल्या कानांवर कोसळतोय आणि आपण दुसरेच कांही तरी करतोय असे होऊ देऊ नये. पूर्ण लक्ष देऊन ऐकले तर ते दीर्घकाळपर्यंत स्मरणात रहाते.
अगदी अलीकडचा तिसरा प्रसंग – झी टीव्हीवर सारेगमापा आणि सोऩीवर इंडियन आयडल एकाच वेळी सूरू होते. झी चॅनेलवरील स्पर्धक खूप छान गाण म्हणत होती – पण मनाने त्यातून हळूच डोक वर काढल, " तिकडे सोनी वर कोणते बरे गाणे चालू असेल? " - हात अभावित पणे रिमोट कण्ट्रोलकडे वळले, तेवढ्यात --- मनाच्याच कुठल्या तरी कप्प्यातून दुसरा आवाज आला – " समोरचे गाणे छान रंगत आहे – त्याचा पूरेपूर आंनद घ्यायला कधी शिकणार? का बरे याचवेळी दुसरीकडील माहिती तपासण्याचा मोह? तिकडले गाणे याहून चांगले असेलही किंवा नसेलही. पण तपासण्या करत बसण्यापेक्षा समोर जे चांगले आले आहे त्याचाच आनंद घ्यावा."
हे तीन प्रसंग मी कां मांडले आहेत? कारण तीनही मधे विचारपूर्वक ग्रहण करणे हा मुद्दा ठळकपणे दिसून येतो. नेमका हाच संस्कार आपल्या नव्या नव्या पिढ्या विसरत चालल्या आहेत. एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे भटकत जाणे याची एवढी सवय जडत आहे की एकाग्रता, किंवा एकतानता हा गुण आत्मसात करणे जमेनासे झालेले आहे.
ज्ञानग्रहणाचे पूर्वापार चालत आलेले मार्ग होते - एकाग्रश्रवण आणि एकग्रवाचन. या दोन्ही शब्दातील एकाग्र हे विशेषण महत्वाचे आहे. यांच्या जोडीला स्वाध्याय – म्हणजे स्वतःचे चिंतन करून एखादा विषय समजून घेणे हे ही महत्वाचे आहे. म्हणूनच " मी चावून चावून पुस्तक वाचतो " या वाक्याचे महत्व आहे. थोडेसे वाचन केल्यावर पूस्तक मिटून आतापर्यंत आपण काय वाचले, त्यातील काय समजले, त्यांतील किती आपल्या व्यवहारात उतरवायचे, अशा मुद्यांवर चिंतन करून मगच पुढची पाने वाचावी ही ती पध्दत.
आधुनिक काळात म्हणजे गेल्या साठ – सत्तर वर्षांत ज्ञान मिळवण्यासाठी रेडियो आणि टीव्ही ही दोन नवी माध्यमे निर्मांण झाली. पुस्तकवाचनापेक्षा कमी बौध्दिक श्रमात ज्ञानार्जन साध्य होऊ लागले. आळस हा मनुष्यस्वभावच आहे – मग तो शारीरिक आळस असो अथवा बौध्दिक आळस असो. याच न्यायाने लोक पुस्तककडून रेडियो, टीव्हीकडे व आता त्याही पलीकडे जाऊन सोशल मीडीयाकडे वळत चाललेले आहेत. झटपट लाभ, झटपट ज्ञान, सार कांही झटपट, ही त्या मागची मनोवृति आहे. म्हणूनच या मनोवृतिचे विश्लेषण व त्यातील धोके जोपर्यंत तरूण पिढीच्या लक्षात आणून दिले जात नाही तोपर्यंत त्यांना वाचन संस्कृतिकडे वळवणे कठीण आहे.
काही वर्षीपूर्वी एका परिचिताने मला त्यांच्या दोन-तीन व्याधींबाबत सांगितले. मी सुचवले की ही ही योगासने दोन दोन मिनिटे करा, लाभ होईल. ते स्वतः डाँक्टर होते. म्हणाले, छे, तेवढा वेळ कां घालवायचा? त्यापेक्षा औषधाच्या दोन गोळ्या घेतल्या की भागते. या संवादानंतर सुमारे दहा वर्षांनी त्यांनी मला सांगितले -- गोळ्या खाऊन उपयोग होत नव्हता, आता योगासने करतो- व्याधीमुक्त आहे, पण अहो, रोज वीस मिनिटे फुकट जातात.
म्हणजे रोगमुक्तिचा लाभ राहिला बाजूला, हा रोज योगासनांमधे जाणारा वेळ फुकट जातो आहे असेच त्यांना अजूनही वाटत होते. यातून आपण कांय मिळवतो आहे आणि त्याचे आपल्या जीवनात कांय मूल्य आहे याचा विचार ते अजूनही करत नव्हते.
वाचन संस्कृती देखील सध्या याच टप्प्यातून जात आहे. म्हणून वाचन संस्कारांची पेरणी देखील टप्याटप्याने करावी लागणार आहे. अगदी लहान बालकांना घरी पालकांनी पुस्तके वाचून दाखवणे, त्यांच्या हातात विविध विषयांची पुस्तके, बालमासिके, वर्तमानपत्र इत्यादि देणे, वाचलेल्या विषयांची चर्चा – असे कित्येक प्रकारचे संस्कार घरात घडू शकतात. पण त्यासाठी आईवडील अगर आजी-आजोबांनी वेळ काढणे अपरिहार्य आहे.
शाळेत नियमितपणे वाचनालय वर्ग असणे, वाचलेल्या गोष्टींचे सार ग्रहण रसग्रहण अथवा पाठ म्हणणे यासारखे उपक्रम शाळांमधे असले पाहिजेत. वीसेक वर्षांपूर्वी श्री नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी " गुजरात वाचतो आहे" या नावाने एक वाचन- मोहिम चालवली होती. तसे अजूनही बराच काळ करावे लागेल.
वाचनालये हे कुठल्याही शहराचे वैभव असते. महाराष्ट्रात एकेकाळी वाचनालयांनी खूप मोठ्या मोठया जनक्रांति घडविल्या आहेत. शंभर वर्षाहूनही अधिक काळ टिकलेली वाचनालये आपण आजही पहातो. मात्र या सांस्कृतिक समृद्धीची दखल शासन किंवा समाज प्रकर्षाने घेत नाही. यातील बव्हंशी वाचनालयांना सध्या एकरकमी मदतीची गरज आहे. इमारत दुरूस्ती, इलेक्ट्रिक वायरिंगचे नवीकरण, रॅक्स, कम्प्युटरायझेशन, अशा प्रकारची मदत तर हवीच आहे. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे इथल्या जुन्या स्टाफकडे पुस्तकांच्याबाबत असलेली प्रचंड माहिती. त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांना लेखन-प्रवृत्त केले तर येत्या कित्येक पीचडी विद्यार्थ्यांना संदर्भासाठी हे लेखन उपयुक्त ठरेल. पण या सर्व गोष्टी करण्याची सरकारची मनोभूमिका पाहिजे. त्याउलट आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी अगदी सध्याच्या बीजेपी शासनानेदेखील सरकारी वाचनालये देखील मोडीत काढण्याची तिथे स्टाफ न नेमण्याची किंवा असलेल्या स्टाफच्या मागण्यांचा विचार न करण्याची भूमिका घेतलेली आहे. नाही म्हणायला शिक्षण संचालकांच्या कार्यकक्षेत वाचनालये हा विषय देऊन ठेवलेला आहे. पण लोकांना कुठे वाचायला वेळ असतो असा विचार स्वीकारून वाचनालयांकडे दुर्लक्ष सुरू आहे. त्याऐवजी वाचनसंस्कृति वाढेल अशी भूमिका असणारा योग्य अधिकारी आल्यास हे चित्र पालटू शकेल.
मला आश्यर्य वाटते ते हे की चांगल्या वाचनालयांचा लाभ घेऊन व मानाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत आलेले वरिष्ठ अधिकारी वाचनालयांच्या आणि वाचनसंस्कृतिच्या अधोगतिकडे अलिप्तपणे कसे पाहू शकतात?
एक मात्र मान्य करावे लागेल. यूरोप अमेरिका सारख्या विकसित देशातही टीव्ही व इंटरनेट आल्यानंतर वाचन संस्कृतिला थोडा फटका बसला होता पण त्यांनी आधुनिकीकरणाच्या व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यावर तोडगा शोधला. सर्व पुस्तकांची यादी, अनुक्रमणिका व पुस्तक परिचय इत्यादी माहिती वाचनालयाच्या वेबसाइटवर असणे, नवी नांव नोंदणी अथवा पुस्तक मागणी ईमेलच्या माध्यमातून सुलभ करणे, आधी कुणी तरी वाचायला घेतलेले पुस्तक परत आल्याची माहिती ईमेलवर पुरवली जाणे, प्रसंगी वाचकांपर्यंत कुरियर डिलिव्हरीने पुस्तक पोचवणे यासारखे उपक्रम सर्व वाचनालयांनी राबवले. एकमेकांकडील पुस्तकांची माहितीही कित्येक वाचनालये देउ लागली. या सर्वामुळे वेळेचा अपव्यय होत नाही असे लक्षात येऊन वाचक वर्ग पुन्हा वाचनाकडे वळू लागला. आपल्याही वाचनालयांमधे असे आधुनिकीकरण व्हायला हवे.
मला वाटते यासाठी यासाठी सरकारने एकदाच एकरकमी ग्रांट द्यावी. कुठे खर्च करणार ते न विचारता, तसले बंधन न घालता, द्यावी. पंधरा ते पंचवीस वर्षे टिकलेल्या वाचनालयांना पंचवीस लाख, २५ ते ५० वर्षे झालेल्यांना पन्नास लाख व त्यावरील सर्वांना एक कोटी. महाराष्ट्रातील सर्व वाचनालयांना नवी झळाळी येण्यासाठी फक्त शंभर – सव्वाशे कोटी रूपये पुरेसे आहेत. हजारो कोटी रूपयांच्या योजना करणा-या शासनाला हे सहज शक्य आहे.
वाचनालयांनी देखील त्यांच्या सदस्यांसाठी व्याख्यानमाला, ग्रंथ-वाचन, कविता- पाठ यासारखे उपक्रम घेत राहिले पाहिजेत. याबाबत नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानने चालवलेला उपक्रम " ग्रंथ तुमच्या दारी" हा एवढा यशस्वी ठरला आहे की परदेशांत देखील मराठी वाचक याचा लाभ घेत आहेत. तसेच खेडयातील शाळांमधे वाचन संस्कृती वाढावी म्हणून rural relations या संस्थेद्वारे चालणारा ज्ञान –Key हा उपक्रमही विशेष उल्लेखनीय आहे.
शेवटी पुस्तकांचे गांव म्हणून प्रसिद्ध झालेल्या सातारा जिल्ह्यांतील भिलार गांवाचा उल्लेख निश्चितच करावा लागेल. वाचन संस्कृतीचा सर्वत्र ऱ्हास होत असातांना भिलारसारखे पुस्तकांचे गांव असणे व ते पर्यटन विभागाच्या नकाशावर असणे हे खूपच आशादायक आहे. याच न्यायाने दीर्घकाळ टिकलेली वाचनालयेदेखील पर्यटन विभागाने नकाशावर घेतली पाहिजेत.
--------------------------------------------------------------------------