मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, July 21, 2013

पुन्हा चरखा -- सुजय लेले लोकसत्ता ८ जुलै २००९ डीटीपी व चित्रप्रत

पुन्हा एकदा चरखा....

-- डॉ. सुजय लेले

एकोणीस जून २००९ चा दिवस होता. दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. माऊलांची पालखी सासवड मुक्कामाला पोहोचलीं होती. सर्वत्र हरिनामाचा गजर, टाळांचा किणकिण आवाज, भागवत धर्माच्या फडफडणाऱ्या पताका या सर्वांच्या साक्षीने एका इतिहासाची नव्या स्वरूपात पुनरावृत्ती होणार होती. पुन्हा एकदा चरख्याचं चाक कालचक्राला फिरवणार होतं.

मित्रांनों, मला या क्षणाचा साक्षीदार होता आलं, ते माझ्या गुरूस्थानी असलेल्या लीना ताईमुळे. या लीनाताई म्हणजे महाराष्ट्र शासनातील प्रधान सचिव सौ. लीना मेहंदळे. खरं सांगायचं तर आज जर मी एवढे भरभरून लिहीत असलो तरी प्रथम मी थोडा सांशकच होतो. हे एकवेळ मान्य केलं, की गांधीजींनी चरख्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळ लोकांपर्यंत पोहोचवली, स्वदेशीचे महत्व पटवले, पण आता तंत्रज्ञानाच्या जमान्यात हा चरखा कसा बरे टिकाव धरणार? आणि चरख्याचा अट्टाहास खरंच धरावा का? पण केवळ लीनाताईंनी हा मुद्दा उचलून धरला म्हणून व वारी बघण्याच्या उत्सुकतेमुळे मी त्यांच्या बरोबर सासवडला गेलो आणि हळूहळू माझ्या डोक्यातली चक्रं फिरू लागली. माझ्या प्रश्नांना उत्तरे मिळू लागली. मोठी माणसे आपल्या कृतीतून उत्तरे देतात याचा प्रत्यय येऊ लागला. हा अनुभव मला मिळाला पालखीच्या सासवड मुक्कामात.

वारीला लाखो माणसं जात असतात. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही वारीला भक्तगण येतात. वारीमध्ये ज्याप्रमाणे विठ्ठलाची ओढ आहे, त्याचप्रमाणे प्रबोधन घडवण्याचे सामर्थ्यही आहे. जर या लाखो माणसांच्या हातात चरखा दिला तर त्यातून मिळणाऱ्या धाग्यातून हजारो मीटर वस्त्र तयार होऊ शकेल. पण आता प्रश्न पडतो की वारीमध्ये सूत का कातायचं? याचं कारण म्हणजे धर्माबरोबर कर्म करायचं म्हणजे कर्मालाही ईश्वरी अधिष्ठान लाभतं. वारीत तयार झालेले वस्त्र जर पांडूरंगाला अर्पण केलं व त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला तर वेगळाच आनंदही मिळेल एक वारकरी चरखा चालवताना बघून दुसऱ्यालाही आपण चरखा चालवावा असं वाटेलं. यातून स्वदेशीचा प्रचारही होईल. याचा अर्थ हा नव्हे, की चरखा फक्त वारीतच चालवावा. गावात जाऊन सूत कताई केली तर उत्तमच पण सुरवात वारीपासून. वारकरी नेहमीच कांदा- मुळा भाजीबरोबर विठ्ठलाच नाव घेतो. वारीत असतानाही चरितार्थाचा विचार सोडत नाही. वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी गाई- गुरांचे बाजार भरतात. हे वारकरी वारी मार्गावर बी- बियाणांची व शेती-अवजारांची खरेदी करतात. त्यात आता चरख्याचीही जोड देता येईल.

पण आधी म्हटल्याप्रमाणेच माहिती तंत्रज्ञानाच्या युगात चरखा खरंच उपयुक्त आहे का याचं उत्तर होय अस आहे. कारण आजसुद्धा अनेक गावांत वीज नाही, अनेक गावांपर्यंत पक्के रस्ते पोचले नाहीत, प्रगतीचा ओघ समप्रमाणात विस्तारलेला नाही. शहरात मोठी सूतिकागृहे आहेत पण गावामध्ये सुईणींचे महत्व आपण नाकारू शकत नाही तसाच हा मुद्दा. जोपर्यंत शिक्षण, तंत्रज्ञान, योग्य भांडवल समप्रमाणात सर्व भारतभर पसरत नाही तोपर्यंत आपल्याला चरख्यासारख्या जुन्या वाटणाऱ्या गोष्टींना नाकारता येणार नाही.

इथे एक गोष्ट मी नमुद करू इच्छितो, की चरखा चालवण्यामागे प्रतीक स्वीकारण्याचा अवास्तव अट्टाहास नाहीये, तर एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे. चरख्यावर कातलेल्या धाग्यापासून बनवलेले वस्त्र हे इको- फ्रेन्डली असतं. लीनाताई अस म्हणतात, की मिलमधे एक मीटर कापड तयार होण्यासाठी सत्तर लीटर पाणी लागत, पण हातमागावर कापड तयार करताना पाणी लागत नाही. आपण जर जास्तीत जास्त सुती कपडयाचा वापर केला तर विदर्भातील आर्थिक संकट दूर होण्यास मदत होईल. मी आधुनिकतेच्या विरोधात नाही. पण जिथे आधुनिक यंत्र व तंत्र वापरणे आर्थिकदृष्टया शक्य नाही तिथे आपल्याला अशी सुलभ तंत्रे वापरली पाहिजेत.

मी थोडं पुढे जाऊन असेही म्हणेन की, कॉम्प्युटर वा मोबाईलवर वेगवेगळे गेम्स खेळून टाईमपास करण्यापेक्षा मुलांना चरखा चालवणे खेळ म्हणून शिकवले तर खूप फायदा होईल. चरखा चालवण्यामध्ये प्रचंड एकाग्रता लागते. जरा जरी लक्ष विचलित झाले तर धागा तुटतो. चालवण्यामध्ये हात, चरखा स्थिर ठेवण्यामध्ये पाय व डोळे यांच्यात सुसूत्रता लागते. मला असं वाटतं की हे सर्व अभ्यासासाठीही उपयुक्त आहे.

ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये असे म्हटले आहे

संताचे संगती मनोमार्ग गती, आकलावा श्रीपती येणे पंथे.

वारीमध्ये जाऊन ईश्वराचे किती आकलन झाले हे मला माहीत नाही, पण संत प्रवृत्तीच्या व्यक्तीबरोबर थोडा काळ राहिल्यामुळे चरख्याचे तत्वज्ञान काही प्रमाणात समजले आणि जे समजले ते मी इथे व्यक्त केले.

---------------------------------------------------------------


Sunday, June 16, 2013

शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवणे शक्य आहे.



व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या समावेशाने शिक्षाणाची घसरण थांबेल

लीना मेहेंदळे
केसरी दि. २०.०५.९६

पुणे : सध्याच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करुन त्यात व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव केला तर शिक्षणाचा खेलखंडोबा निश्च्िातपणे थांबवता येईल, अशी आशा जमाबंदी आयुक्त लीना मेहेंदळे यांनी रनिवारी वसंत व्याख्यानमालेचे २९ वे पुष्प गुफंताना सांगितले.

शिक्षणाचा खेळखंडोबा थांबविता येईल काय या विषयावर मेहेंदळे बोलत होत्या. सतरा-अठरा वर्षें शिक्षण घेतल्यानंतर आपल्याकडील करुण नोकरीसाठी लायक होतो ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. तरुणांना व्यावसायिक शिक्षण देऊन चार-पाच वर्षांत त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

जग ज्या वेगाने पुढे सरकत आहे त्या वेगाने अभ्यासक्रमात बदल करणे अपेक्षित आहे. मात्र आपण अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर त्याची अंमलबजावणी दोन वर्षांनंतर करतो तेव्हा अभ्यासक्रमात आणखी बदल होणे अपेक्षित असते, असे मेंहेदळे म्हणाल्या. आपल्या देशात शिक्षण या विषयावर मुलांचा फार वेळ वाया जातो. सरकारला आपण आवश्यक तेवढेच शिक्षण देण्याचा आग्रह धरला पाहिजे. दरवर्षी अंदाजपत्रकात शिक्षणासाठी पंधरा टक्कयांपेक्षा जास्त तरतूद केलेली असते तरीहि आपल्या देशात सुमारे ५८ टक्के जनता निरक्षर आहे, असे त्या म्हणाल्या. लोकसंख्येच्या केवळ एक टक्का व्यक्ति पदवीधर आहेत. आत्यंतिक गरिबी हेच शाळंतील गळतीचे प्रमुख कारण आहे. पहिल्या इयत्तेसाठी विद्यार्थीं शाळेत नाव नोंदवतात, मात्र यातून इयत्ता दुसरीत ३० टक्के, चौथील ६० टक्के, ८ वीत८० टक्के विद्यार्थी गळतात. इयत्ता अकराबीत फक्त दहा टक्के विद्यार्थी प्रवेश घेतात, त्यातील एक टक्का विद्यार्थी पदवीपर्यंत शिकतात, ही आपल्या देशातील शिक्षणाची शोकांतिका आहे, असे त्या म्हणाल्या.

दूरदर्शन हे सरकारी माध्यम फक्त जाहिरातींद्वारे पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. त्यातून शैक्षणिक कार्यक्रंमांचे हवे तेवढे प्रसारण होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

'दहीवी बारावीची परीक्षा सुखरुन पार पाडल्याशिवाय आयुष्यात मोक्षप्राप्त्िा नाही' असा समज आपण करुन घेतल्यामुळे या परीभांना अवास्तव महत्व प्राप्त झाले आहे. दहानी-बारावीच्या पेपरची फेरतापासणी करावयाची असल्यास, 'गुणांची बेरीज परत केली जाईल, पण पेपरची फेरतपासणी केली जाणार नाही हे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाचे धोरण अत्यंत चुकीचे असल्याचे मेहेंदळे यांनी सांगितले.

शिक्षणाचा हा खेळखंडोबा सर्वांनी संघडितरीत्या अनिष्ट गोष्टींविरुद्ध आवाज उठवल्यास थांबू शकेल, असे मेहेंदळे म्हणाल्य, प्रस्ताविक अविनाश कुलकर्णी यांनी केले व आभार खं. तुं केसकर यांनी मानले.






व्यावसायिक शिक्षणावरील भर आता वाढविण्याची गरज

सकाळ दि. २०.०५.९६

पुणे, ता. १९ : शिक्षणाची हेळसांड थांबविण्यासाठी पुस्तकी शिक्षणाची वर्षे कमी करुन व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे, असे मत राज्याच्या जमावबंदी आयुक्त डॉ. लीना मेहेंदळे यांनी आज येथे वसंत व्याख्यानमालेत व्यक्त केले.

'शिक्षणाचा खेलखेडोबा थांबविता येईल को?' या विषयावर त्या बालेत होत्या, थांबविता येईल, असा विश्र्वास सुरवातीलाच व्यक्त करुन त्या पुढे म्हणाल्या, 'आपण दहावी आणि बारावीचे महत्व अकारण वाढविले आहे. सध्या देशातील ४८ टक्के जनता दारिद्रयरेषेखाली आहे. शिक्षणात गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. पहिली ते दहावीपर्यंत १० टक्के गळती होते. त्यात मुळींचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठी 'कॅपिटेशन फी' आकारणे यासारख्या गोष्टींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.'

'शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा मोलाचा वेळ जातो. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एका विद्यार्थ्याला १२ ते १५ वर्ष घालविणे देशाला परडणारे नाही. एवढे होऊनही या शिक्षणामुळे मुले स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाहीत. यासाठी शिक्षणाचा कालावधी कमी करून व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे. मुलांना रोजीरोटी कमविण्याची क्षमता देणारे मध्यम पातळीवरील तांत्रिक शिक्षण देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातही याकडे जास्त लक्ष दिले गेले  पाहिजे. दूरदर्शन या माध्यमाचा उपयोग शिक्षणासाठी जास्त वेळ करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी सरकारने प्रयोजक शधले पाहिजेत,' असे त्या म्हणाल्या. पेपर फुटणे, फेरतपासणी, कॅपिटेशन फी किंवा शिशुवर्गात प्रवेशासाठी मुलाखती घेणे याबाबत शासनाच्या प्रशासनाकडे निर्णय घेण्याची क्षमता होती, परंतु प्रशासनाने निर्णय घेतले नाहीत, अशी खंत व्यक्त करून त्या म्हणाल्या, की शिक्षणाची सर्वत्र हेळसांड होत असली, तरी गेल्या काही वर्षांतील लोकजागतीमुळे जो बदल घडला आहे त्यामुळे शैक्षणिक सुधारणा होण्यास वाव आहे, असे वाटते. एखाद्या गोष्टीविरुद्ध लोकांनी संघटितपणे आवाज उठविल्यावर शासनाला त्याची दखल घ्यावी लागते. हे सिद्ध झाले आहे. शिक्षणावर खर्चही भरपूर केला जातो, परंतु अपेक्षित यश मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, शासनाने केवळ महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या कार्यक्रम हाती घेतला, तरी मोठा फरक पडेल, असा विश्र्वास श्रीमती मेहेंदळे यांनी व्यक्त केला.









शिक्षणक्षेत्रातील अपप्रवृत्तींविरुद्ध संघटित प्रयत्नांची गरज
लीना मेहेंदळे
लोकसत्ता दि. २०.०५.९६

पुणे, दि. ११ - शिभणक्षेत्रातील आजच्या अपप्रवृत्तींविरुद्ध संघटितरीत्या आवाज उठावला, तर बदल होऊ शकतो, हे सिद्ध झाले असल्यामुळे या क्षेत्रातील खेळखंडोबा थांबू शकतो, असे आशावादी विचार प्रशासकीय अधिकारी लीना मेंहेंदळे यांनी मांडले.

'शिक्षणाचा खेळखंबोडा थांबविता येईल का,' या विषयावर वसंत व्याख्यानमालोत आज श्रीमती
वसंत व्याख्यानमाला
मेहेंदळे यांचे व्याख्यान झाले. श्री. अविनाश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर श्री. खं. तु केसकर यांनी आभार प्रदर्शन केले.

शिक्षणक्षेत्रातील विविध समस्या श्रीमती मेहेंदळे यांनी प्रारंभी मांडल्या, छोटया-छोटया निर्णयांसाठी शासकीय अधिका-यांकडे लोकांना हेलपाटे मारावे लागतात, महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतात, प्रवेशासाठी 'कॅपिटेशन फी' द्यावी लागते आणि उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी न करता केवळ गुणांची बेरीज तपासली जाते. अशा अनुभर्वामुळे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या क्षेत्रावरील विश्र्वास उडून जातो, असे त्या म्हणाल्या.

शाळामधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ही चिंतेची गोष्ट आहे, असे सांगून दहावी, बारावीपर्यंत शिक्षण घेऊनही त्या शिक्षणाची बाजरातील आजची किंमत शून्य असल्यामुळे शिक्षणपद्धतीचाच पुनर्विचार करावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कॅपिटेशन फी विरुद्ध पालकांनी न्यायलयात दाद् मागितल्यानंतर एका ठराविक मर्यादेबाहेर अशी फी घेता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला. दहाविच्या फेरपरीक्षांच्या निर्णयाविरुद्ध संघटितरीत्या आवाज उठविण्यात आल्यानंतर तो निर्णय सरकारला बदलावा लागला, अशी उदाहरणे पाहिल्यानंतर मनात आशावाद जागा राहतो, असे त्यांनी सांगितले.

अभ्यासक्रमात सर्वप्रथम आमूलाग्र बदल करावेत आणि व्यावसायिक शिक्षणाचा उपयोग अभ्यासक्रमात करावा, अशी सूचना त्यांनी केली.