प्रिय हेरंब ,
तुमचे आवाहन मिळाले. असर अहवालाच्या माहिती गोळा करण्याच्या पद्धतीबाबत माझ्या मनात शंका असल्या तरी त्या निमित्ताने मुलांच्या लेखन वाचनाबाबतचा मुद्दा समोर आला हे चांगले झाले, असे मला वाटाते. तुमच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काही मुद्दे पुढे मांडत आहे.
वाचन-लेखन म्हणज़े शिक्षण नव्हे असे म्हणेणे मला नुसते चुकीचे नाही तर दुटप्पीपणाचे वाटते. औपचारिक शिक्षणाच्या निरूपयोगितेवर 'सप्रमाण' चर्चा करणारी मंडळी देखील आपल्या स्वत:च्या मुलांना त्यापासून लांब ठेऊ शकत नाहीत यातच सारे आले. त्यामुळे निदान औपरिक प्राथमिक शिक्षण हा सर्वांचा हक्क मानला तर तो प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वयात ( साधारण दुसरीच्या शेवटी ) वाचन-लेखनावर उत्तम प्रभुत्त्व येणे अतिशय म्हत्त्वाचे आहे. कारण वाचन-लेखन आणि गणन येणे ही औपचारिक शिक्षणात यशस्वी होण्यासाठीची अटच आहे. वाचन-लेखनाचे हत्यार कमकुवत राहिले की समजेपेक्षा पाठांतराच्या आणि ते ही न जमल्यास कॉपी वगैरे गैर प्रकारांचा आधार घेऊन परिक्षा पास होणे याशिवाय दुसरा पर्याय मुलासमोर उरत नाही.ग्रामीण भागात काम करताना शिक्षकाच्या मदतीने कशीबशी कॉपी करत उत्तर पत्रिका लिहिणारा वर्गच्या वर्ग मी अनेकदा पाहतो. त्यातल्या अनेकांना आपण कॉपी करून काय लिहतो आहोत हे ही समजत नाही. अशा वेळी शहरी मध्यमवर्गीय नजरेतून या 'बेकायदेशीर' कृत्याचा धिक्कार करायचा का या समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपली नजर बदलायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.मी वैयक्तिक पातळीवर दुसरा पर्याय निवडला आहे.माझ्या या निवडीचे प्रतिबिंब मी पुढे मांडत असलेल्या मुद्द्यांत खचितच पडेल असे मला वाटते.
मुलांच्या वाचन-लेखनातील अपयशामागच्या करणांवर आपल्याकडे होणारी चर्चा ही फार वरवरची असते असे माझे मत आहे.थोडेसे खोलात शिरण्याचा प्रयत्न केला तर तर 'तुम्ही फार तांत्रिक विचार करता' असा शेरा ऐकायला मिळून बोलणेच खुंटते असाही माझा अनुभव आहे.तरीही माझे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करतो.
1. लेखी भाषा वाचून समजून घेणे हे, भाषा ऐकून समजून घेण्यापेक्षा बरेच वेगळे असते.भाषा ऐकून समजून घेताना आसपासच्या स्थळ-काळाचा संदर्भ, बोलणार्या व्यक्तीच्या आवाजातील चढ उतार, व्यक्तीचे हावभाव या सार्याची फारच मोठी मदत आपल्याला होते. वाचून अर्थ लावताना अशी कोणतीच मदत मिळत नाही. शिवाय आपले बोलणे ऐकणार्याला कळते आहे का नाही, याची बरीचशी काळज़ी वक्ता घेत असतो, न समजल्यासारखे वाटले तर पुन्हा सांगतो या सार्या सोयी वाचून अर्थ लावताना नाहीत. तिथे अर्थ समजून घेण्याची सगळी जवाबदारी वाचकाची ! त्या मुळे आधी लिहिलेल्या मजकुराचा अर्थ लावयचा आणि तो अर्थ बरोबर आहे का हे यावर सतत लक्ष ठेवाचे अशी गुंतागुंतीची दुहेरी प्रक्रिया वाचताना होत असते. अर्थातच नव्याने वाचन शिकणार्या मुलांसाठी आकलनाच्या दृष्टीने मोठी उडी असते. पढना है समझना ही NCERT ने तयार केलेली घोषणा मला पटते. कारण वाचन ही एक अर्थ लावण्याची प्रक्रिया आहे.
2. परिसरातली भाषा कानावर पडली की मूल आपसुकच ती शिकते. लेखी भाषेचे मात्र तसे नाही. काही तुरळक अपवाद वगळले तर बहुसंख्य मुलांना वाचायला आणि लिहायला शिकवावे लागते असा आपला सर्वांचाच अनुभव आहे. लेखी भाषा हे बोलण्याच्या भाषेचेच एक रूप आहे हे मुलाच्या लक्षात येणे ही फार मह्त्त्वाची पायरी आहे अनेकदा अक्षरे शिकणार्या मुलांना ती नेमके काय आणि कशासाठी शिकत आहेत याची जाणीवच नसते. अशा वेळी तो एक निरर्थक पाठांतराचा भाग बनतो. Emergent Literacy या साक्षरतेशी संबंधित विचारधारेत मुलांची लेखी मजकुराची जाण कशी कशी विकसित होत जाते यावर बरेच काम पाश्चात्य देशात झाले आहे. दुर्दैवाने आपल्या भाषांत असे काम अजूनही मोठ्या प्रमाणावर झालेले नाही. अंकुरती साक्षरता या विषयीचा एक स्लाईड शो शिक्षक अभ्यास मंडळ या क्वेस्ट्च्या Online व्यासपीठावर उपलब्ध आहे. त्यात या विषयी काही चर्चा वाचायला मिळेल. या संकल्पनेचा वापर अगदी अंगणवाडीपासून व्हायला हवा. क्वेस्टच्या कामात आम्ही हा प्रयत्न करत आहोत.
3. लेखी भाषा हे बोलण्याच्या भाषेचच एक रूप असते. मात्र जिथे मुलांची घरची भाषा व शाळेतील प्रमाण भाषा ( महाराष्ट्रात मराठी ) वेगळी असते तिथे घरच्या भाषेकडून शाळेच्या भाषेर्यंत पोहचण्याचा पूल बांधावा लागतो आणि तो ही घरच्या भाषेबद्दल न्यून गंड तयार होणार नाही याची काळज़ी घेऊन ! आदिवासी भाषा आणि प्रमाण मराठी यात बरेच अंतर असल्याने तिथे शिकवणार्या शिक्षक़ांना याची जाणीव असणे फारच म्हत्त्वाचे आहे. मुलांच्या घरच्या भाषेला शिक्षणात आदराचे स्थान देणे फारच गरजेचे आहे. हे नेमके कसे करायचे या याबाबत काही काम अनुताई वाघ आणि सिंधुताई आंबिके यांनी केले होते. सध्या या दोन्ही भाषांत पूल कसा बांधता येईल यावर क्वेस्ट व प्रगत शिक्षण संस्थेत काही काम चालू आहे मात्र निश्चित ठोस काही सांगण्यासाठी कसलेल्या संशोधकाची आणि पर्यायाने संसाधनांची गरज आहे.
4. बालसाहित्याची उपलब्धता हा मुलांच्या वाचनलेखनावर प्रभाव टाकणारा एक मह्त्त्वाचा घटक आहे. मराठीचा विचार करता आपण ज्याला बालसाहित्य म्हणतो ते खरेतर कुमार साहित्य असते. नुकतेच वाचायला लागलेल्या मुलांसाठी आपल्याकडे फारशी पुस्तके नाहीत ( एकलव्य ,तुलिका , प्रथम यांच्यासारखे तुरळक अपवाद वगळता) आणि जी आहेत त्यातील चित्रे, भाषा , विषय सारे काही शहरी मध्यमवर्गीय मुलांच्या भावविश्वातले आहे. ग्रामीण मुलांच्या अनुभवांशी मिळतीजुळती अशी पुस्तके जवळजवळ नाहीतच. केवळ पाठ्यपुस्तकाची पाने वाचून वाचन लेखनावर प्रभुत्त्व येणे अशक्य आहे. आपल्या सर्वांना हे प्रभुत्त्व मिळवता आले यात घरात येणार्या पुस्तके , मासिके वर्तमान पत्रे यांचा फार मोठा वाटा आहे . त्यामुळे ग्रामीण मुलांना परवडेल अशा पुस्तकांची बाजारपेठ ( मी हा शब्द पूर्ण विचाराने वापरतो आहे !) विकसित होणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळेत किमान पेटीतले वाचनालय असणे व शिक्षकांनी त्याचा योग्य तो वापर करणे गरजेचे आहे.
5. वाचन लेखन कसे शिकवावे यावर विविध दृष्टीकोन दिसतात आपल्याचा विचार करून आरंभिक वाचन लेखन कसे शिकवावे याचे धोरण (केवळ पाठ्यक्रम वा पाठ्यपुस्तके नव्हेत ) ठरवायला हवे असे धोरण ठरवताना लहानप्रमाणात मात्र सखोल झालेल्या कामाचा अभ्यास करायला हवा.आपल्याकडे अशा कामांची फुटक़ळ म्हणून हेटाळणी करण्यातच लोकांना धन्यता वाटते त्याला काय करणार ?विद्यापीठीय पातळीवर अजून हा विषय अभ्यासाचा आहे असे अपल्याला वाटत नाही. काही दशकांपूर्वी वाचन लेखनाबाबत आपल्यासारखीच स्थिती अमेरिकेत होती. ती बदलण्यात विद्यापीठीय संशोधन विभागांचे मोठेच योगदान आहे,
6. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा.आरंभिक वाचन-लेखन या विषयातील गुंतागुंतीची कल्पना आपल्या शिक्षकांना आहे का ? त्यांच्या सेवापूर्व वा सेवांतर्गत प्रशिक्षणात ही समज बनावी असा काही प्रयत्न केला जातो का ? याचे उत्तर, नाहीअसेच द्यावे लागेल. या विषयावर वाचायला मराठीत फारसे काही लिखाण नाही. खरेतर डीएडच्या अभ्यास्क्रम निर्मितीच्या वेळी यावर सांगोपांग चर्चा व्हायला हवी. तशी ती होताना दिसत नाही. या अजस्र आणि गुंतागुंतेच्या समस्येवर जादूच्या कांडीसारखा चालणारा उपाय नाही तर दीर्घ्रकालीन नियोजनाची आवश्यकता आहे. शिक्षकांची या विषयाची समज तयार होईल अशा प्रकारचे प्रशिक्षण योजायला हवे. शिक्षकांसाठी चांगल्या वाचन साहित्याची निर्मिती करायला हवी. या दिशेने एक छोटेसे पाऊल म्हणून क्वेस्ट्ने आपल्या मर्यादित ताकदीत काही वाचन साहित्य व विडीओ फिल्म साईट वरून मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच शिक्षक अभ्यास मंडळाच्या व्यासपीठावर चर्चा सुरू केली आहे त्याचा जरूर वापर करावा. वापर-कर्त्याने मूळ स्रोताचा उल्लेख करावा अशी माफक अपेक्षा आहे. पुढे काही लिंक देत आहे त्या जरूर पहाव्यात
कळावे
नीलेश निमकर
आरंभिक वाचन लेखन विडीओ फिल्मस http://quest.org.in/node/271
------------------------------------------------------------------------------------------------------