मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Wednesday, March 12, 2014

पणजी, जल साक्षरता अभियान अध्यक्षता -रिपोर्ट

पर्यावरण सुरक्षिततेसाठी समाजाने एकजुटीने लढावे
पणजी : नद्या आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहेत. देशात प्रत्येक नदीला मातेच्या नावाने संबोधले जाते. पृथ्वीवर केवळ ४ टक्के पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. विविध खात्यांतील अनेक सरकारी योजना दुसर्‍या योजनेला फाटा देते. योजनांमधील लढय़ात सामाजिकरण, पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. योग्य विचार करून पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी एकजुटीने लढा दिल्यास समाज पर्यावरणाचे संरक्षण करण्यास सक्षम बनू शकेल, असे मत गोवा राज्य माहिती आयोगाच्या प्रमुख माहिती आयुक्त लीना मेहंदळे यांनी 'जलसाक्षरता अभियान' कार्यक्रमात मांडले.
'अनाम प्रेम' संस्थेने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 'जलसाक्षरता अभियान'च्या माध्यमातून नद्यांचा महिला जीवनावर होणारा परिणाम व भारतीय संस्कृतीने नद्यांना दिलेला मातृपदाचा मान याविषयी राष्ट्रीय स्तरावर जागृती करण्यासाठी मंगळवारी कला व संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पर्यावरणीय पत्रकारितेत सक्रिय असलेले पुणे जलबिरादरीचे संयोजक सुनील जोशी व पर्यावरणतज्ज्ञ आय.आय.टी.चे केमिकल इंजिनिअर डॉ. उदय शंकर भवाळकर उपस्थित होते.
मेहंदळे म्हणाल्या की, पर्वत प्रदक्षिणा आणि नदी परिक्रमा आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून आहेत. वाळू हा पाण्याचा संरक्षक स्तर असतो. आपण आधुनिकतेच्या ओघात भारतीय परंपरा विसरत चाललो आहोत. सरकारने वाळू उपसण्याची परवानगी देताना त्याचा पाण्याच्या पातळीवर परिणाम होणार असल्याचे विसरता कामा नये. पर्यावरण टिकवायचे असेल, तर समाजाने स्वत:पासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. भवाळकर म्हणाले, 'बायो सॅनिटायझर इको चिप्स'च्या माध्यमातून समुद्री पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करता येते. निसर्गाची भाषा मनुष्य प्राण्याने शिकल्यास नैसर्गिक आपत्ती रोखता येतील. जे आपल्याला नको ते मातीला परत करा, असा निसर्गाचा सिद्धांत आहे; पण आधुनिक, विज्ञानाच्या आंधळ्या श्रद्धेला बळी पडून निसर्गाच्या विरोधात कार्य करतात. पाणी स्वस्त मिळत असल्याने लापरवाईने वापरण्यात येते, ते महाग केल्यास वाचेल. समुद्राचे खारे पाणी शेतीसाठी वापरता येते. गोव्याला समुद्र संपदा लाभली आहे. यावर संशोधन करून समुद्राचे पाणी शेतीसाठी वापरण्यास यावे. गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर तो कृषिप्रधानही आहे. गोव्यात आताच योग्यप्रकारे पाण्याचे नियोजन न केल्यास अर्थव्यवस्था कोलमडू शकते, अशी शक्यता डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केली.
जोशी म्हणाले की, प्रदूषण, शोषण आणि अतिक्रमण यांनी नद्यांना संपविले आहे. गोव्यातील ग्रामीण भाग हा शेती-बागायतीवर अवलंबून आहे; पण गोव्यातील पाण्याची पातळी पाहता चिंताच जाणवते, असे नमूद केले. युवकांनी स्वयंप्रेरित होऊन आपल्या गावातील नद्यांना पुनर्जीवन देण्यासाठी कार्य करावे, असेही त्यांनी सूचविले.
कार्यक्रमाला समाजसेविका अलका दामले, प्रेरणा पावसकर उपस्थित होत्या. ज्योती पडाळकर यांनी सूत्रसंचालन केले. अनाम प्रेमचे कार्यकर्ते मीरा सामंत व अँड. सतीश सोनक या वेळी उपस्थित होते. 
----------------------------------------------------------------------------------------------

Monday, March 3, 2014

वैदिक गणित के सोलह सूत्र

जगद्गुरू स्वामी भारती कृष्ण तीर्थ द्वारा विरचित वैदिक गणित अंकगणितीय गणना की वैकल्पिक एवं संक्षिप्त विधियों का समूह है। इसमें १६ मूल सूत्र दिये गये हैं। वैदिक गणित गणना की ऐसी पद्धति है, जिससे जटिल अंकगणितीय गणनाएं अत्यंत ही सरल, सहज व त्वरित संभव हैं। स्वामीजी ने इसका प्रणयन बीसवीं शती के आरम्भिक दिनों में किया।...

From facebook post of Harshvardhan Pandit --
स्वामीजी के एकमात्र उपलब्ध गणितीय ग्रंथ ‘वैदिक गणित' या 'वेदों के सोलह सरल गणितीय सूत्र’ के बिखरे हुए संदर्भों से छाँटकर डॉ. वासुदेव शरण अग्रवाल ने सूत्रों तथा उपसूत्रों की सूची ग्रंथ के आरंभ में इस प्रकार दी है—
1. एकाधिकेन पूर्वेण
2. निखिलं नवतश्चरमं दशतः
3. ऊर्ध्वतिर्यग्भ्याम्
4. परावर्त्य योजयेत्
5. शून्यं साम्यसमुच्चये
6. (आनुरूप्ये) शून्यमन्यत्
7. संकलनव्यवकलनाभ्याम्
8. पूरणापूरणाभ्याम्
9. चलनकलनाभ्याम्
10. यावदूनम्
11. व्यष्टिसमष्टिः
12. शेषाण्यङ्केन चरमेण
13. सोपान्त्यद्वयमन्त्च्यम्
14. एकन्यूनेन पूर्वेण
15. गुणितसमुच्चयः
16. गुणकसमुच्चयः

Sunday, March 2, 2014

राष्ट्रीय विज्ञान दिन - लीना मेहेंदळे व्याख्यान


राष्ट्रीय विज्ञान दिन - लीना मेहेंदळे व्याख्यान
सांगली येथे मराठी विज्ञान प्रबोधिनी या संस्थेतर्फे राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या निमित्त गोवा राज्याच्या माहिती आयुक्त लीना मेहेंदळे यांचे विलिंग्डन कॉलेजमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले विचार लेख स्वरुपात संपादित केले आहेत.
कोणत्याही युगाची प्रगति ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असते. वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे काय आणि आपल्या देशांत ही विज्ञान प्रगती कशी होईल याची चिंता सर्वांनी करावी अशी आज परिस्थिती आहे. प्रत्यक्ष प्रयोगाला विज्ञानात फार महत्व आहे. मला नववीच्या वर्गात असताना भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील माझ्या पहिल्यावहिल्या प्रयोगात एक उत्तम वस्तुपाठ मिळालावर्गात प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाकावर एक चौकोनी ठोकळा व एक मापनपट्टी ठेवली होती. शिक्षकांनी सर्वांना ठोकळ्याच्या बाजूचे माप काय असे विचारले. प्रत्येकाने पट्टीने कोणतीतरी एक बाजू मोजून उत्तर लिहिले. शिक्षकानी सांगितले की केवळ एका बाजूचे एकदाच माप घेतले तर ते प्रयोगांती उत्तर होत नाही. ठोकळ्याच्या सर्व बाजूंची प्रत्येकी किमान तीन वेळा मापे घेऊन त्यांची सरासरी काढली तर अधिक अचूक उत्तर येईल. म्हणून एका बाजूचे माप घेणे याला मापन (Measurement) असे म्हणायचे तर हेच मापन अधिक वेळा करून परिणामाची कन्सिस्टंसी (एकवाक्यता) तपासणे, तसेच सर्व बाजूंची मापे घेऊन सरासरी उत्तर काढणे म्हणजे मापनाचा वैज्ञानिक प्रयोग (Experiment) होय. प्रयोगामधे वारंवार करून पहाण्याला फार महत्व असते. एकदाच केलेले अपुरे किंवा अवैज्ञानिक ठरेल.

डॉ. सी. व्ही. रामन यांनी कलकत्त्यातील छोट्या प्रयोगशाळॆत  प्रयोग करून नोबेल पारितोषिक मिळविले. मात्र त्यांच्या नंतर नोबेल पारितोषिक मिळविलेल्या  सर्व भारतीयांनी परदेशात संशोधन करून असे यश मिळविले. भारतात आता आधुनिक सांगितल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा आहेत मात्र नोबेल दर्जाचे  संशोधन का होत नाही याचा विचार व्हावयास हवा. ही स्थिती बदलायला हवी.

भविष्यकाळात भारत हा जगातील सर्वात तरूण देश ठरणार आहे. कारण भारतात १५ ते ३५ वर्षांच्या वयोगटातील लोकांची संख्या जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक असणार आहे. या संधीचा फायदा घेऊन भारताला अग्रेसर करण्यासाठी आपणा सर्वानी, विशेषतः विद्यार्थ्यांनी झटले पाहिजे. शोध घेणे (Investigate), शोध लावणे (Invention), विचार करणे (Think) आणि उपलब्ध ज्ञानाचा योग्य उपयोग करून (Application) संशोधनाचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. याबरोबरच विज्ञानातील विविध विद्याशाखात असणारे परस्पर संबंध दृढ करून ज्ञानाची व्याप्ती व उपयुक्तता वाढविली पाहिजे. यासाठी कॉलेज व विद्यापीठांनी मोठ्या संख्येने इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस वाढवले पाहिजेत.

मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. त्यांचे सर्व प्रयोग किरणोत्सर्गाविषयी होते. मात्र त्यांना या संशोधनाबद्दल रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक  मिळाले होते. हे लक्षात घेतले पाहिजे. याचसाठी विषयांच्या चौकटीत अभ्यास न करता आवश्यकतेनुसार इतर विद्याशाखेतील ज्ञान घेऊन संशोधन परिपूर्ण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी संबंधित दुसर्‍या विद्याशाखेतील मूलभूत संकल्पनांची ओळख होण्यासाठी कमी अवधीचे शीघ्र प्रशिक्षण वर्ग (क्रॅश कोर्सेसही) आयोजित करण्याची गरज आहे.

संशोधनासाठी आणखी एका गोष्टीची गरज आहे. ती म्हणजे प्रयोगाचे नोंदीकरण (Documentation). संशोधनातील टप्पे, प्रयोगाचे साहित्य, कृती व मिळालेले निष्कर्ष यांची तपशीलवार नोंद ठेवणे अतिशय आवश्यक आहे. आपण भारतीय मंडळी उत्सवप्रिय असतो. एखाद्या वस्तूचे वा संशोधनाचे सादरीकरण वा प्रसिद्धी यासाठी  आपण भरपूर कष्ट घेतो. मात्र अशा प्रयत्नात कार्यक्रम संपला की खंड पडतो. त्यात सातत्य रहात नाही. परिक्षेच्या वेळचा अभ्यास परिक्षा संपल्यानंतर आपण विसरून जातो. सतत आस लागुन रहाणे व प्रयत्न करणे म्हणजेच अभ्यास आहे. संशोधनाला अशा सातत्याची गरज असते.

भारतात आता बर्‍याच मोठ्या संशोधन प्रयोगशाळा व विज्ञान संग्रहालये उभारण्यात आली आहेत. त्यांना भेटी देऊन नव्या उपकरणांची व विज्ञानशाखांची आपण माहिती घेतली पाहिजे. अशा भेटी दिल्या की आपल्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत मिळते. तसेच दीर्घकालीन दृष्टि तयार होते.

वैज्ञानिकतेचा महत्वाचा निकष म्हणजे प्रयोगाला सैद्धांतिक जोड मिळणे. हायड्रोजन स्पेक्ट्रमवरील प्रयोगांत दिसून आलेल्या बामेर लाइन्सची व्याख्या एका सिद्धांताने करता आली, पण त्याच प्रयोगांत पुढे सापडलेल्या इन्फ्रा रेड रेंजमधील स्पेक्ट्रमची व्याख्या करता येइना, तेंव्हा नवीन धडाडीच्या सिद्धांताची मांडणी करून बोर याने व्याख्या केली आणि अशा रितीने अणुची संरचना जगाला समजून आली.

संशोधनासाठी चिकाटीची आवश्यकता असते. अपयशाने निराश न होता चिकाटीने प्रयत्न चालू ठेवल्यास यश मिळते. पॉझिट्रॉनचा शोध लावण्यासाठी,  वैश्विक किरणात पॉझिट्रॉन असण्याची शक्यता गृहीत धरून एका शास्त्रज्ञाने (बहुधा ब्लेक किंवा अँडरसन) 1920 ते 1930 या कालखंडात क्लाउडचेंबरवर वैश्विक किरणांच्या मार्‍याचे तब्बल ६०००० फोटों काढले व त्यांचे परिक्षण केले त्यात त्याला एका फोटॊत पॉझिट्रॉनचा मार्ग नोंदला गेल्याचे आढळले. एवढी चिकाटी ठेवली म्णून पॉझिट्रॉनचा शोध लागू शकला.

मायकेल्सन याने प्रकाशाचा वेग मोजला. मात्र प्रकाशाच्या संवाहनासाठी इथर नामक माध्यम असावे लागते अशी धारणा होती व या इथरचे अस्तित्व पकडण्यासाठी- समजून येण्यासाठी त्याने एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाची संकल्पना मांडली. ती मला नेहमी थक्क करून सोडते. या प्रयोगातून त्याला प्रकाशाचा वेग अचूकपणे नोंदवता आला त्याचबरोबर इथर किंवा त्यासदृश काहीही असूच शकत नाही - असते तर माझ्या उपकरणांनी त्याचे अस्तित्व पकडले असते असे तो ठामपणे सांगू शकला - त्यातून पुढे आईनस्टाईनने रिलेटिव्हिटीचा अभूतपूर्व सिद्धांत मांडला. या प्रयोगांसाठी मायकेल्सनने जी सूक्ष्म संवेदनशील उपकरणे विकसित केली होती त्यासाठी त्याला नोबेल पारितोषिक मिळाले. पण मला विचाराल तर त्याच्या प्रयोगासाठी आवश्यक कल्पनाभरारीसाठीही त्याला पारितोषक मिळायला हवे होते. अशी कल्पनाभरारीच विज्ञानाला पुढे नेऊ शकते.

माझ्या पहिल्या विज्ञानप्रयोगाविषयी तुम्हाला सांगितले.   हा प्रयोग झाल्यावर दुसर्‍या दिवशी शिक्षकांनी असाच प्रयोग पट्टीच्या सेंटीमीटरऎवजी इंचाची बाजू वापरून करावयास सांगितले. इंचाचा दहावा भाग मिलिमीटरपेक्षा कितीतरी मोठा असल्याने ठोकळ्याची बाजू मोजताना त्याची कड दोन भागचिन्हांच्या मधे येण्याची शक्यता अधिक होती अशा वेळी मधल्या मोकळ्या जागेचे काल्पनिकरीत्या दहा भाग कल्पून अंदाजे मापन (Approximation) करता येते - नव्हे तसे करायला शिकून घ्यायचे असते - हे ठसवण्यासाठी तो प्रयोग होता. या अंदाज घेण्याच्या पद्धतीचा उपयोग सामाजिक शास्त्रात सार्वमताचा कौल अजमावण्यासाठी केला जातो. तसेच तुमच्या कित्येक गणितांमधे अचूक संख्येची गरज नसून जवळपास काय उत्तर असेल तेवढा अंदाज घेऊन पुरतो - अशा वेळी आपल्याला Approximation करता यायला हवे

सर्व शोधांची जननी जिज्ञासा आहे. जिज्ञासा पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद संशोधनाला प्रेरणा देतो. कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास न ठेवता त्याचे कारण जाणून घेण्याची प्रवृत्ती, कां व कसे हे दोन प्रश्न सतत विचारत रहाणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन होय. मात्र हे कारण शोधण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करणे जरूर आहे. दुसर्‍यांच्या निष्कर्षावर अवलंबून राहू नका.

सध्या भारतात असे आढळते की पूर्वी सिद्ध झालेले प्रयोगच संशोधनासाठी बर्‍याच वेळी निवडले जातात. यात पैसा व श्रम खर्च होऊन प्रत्यक्ष नवे संशोधन होत नाही. यासाठी पुनः चाकाचा शोध लावण्याचा प्रयत्न करू नका. मायकेल्सन प्रमाणे नव्या धर्तीचे प्रयोग मांडायला शिका.

या ठिकाणी मला अजून मांडावीशी वाटते ती गोष्ट म्हणजे अध्यात्म व विज्ञान यांचा विचार. भारतीय तत्वज्ञान अध्यात्माकडे नेणारे असून त्यात वैयक्तिक अनुभूतीला महत्व दिले जाते तर  विज्ञानात वैयक्तिक अनुभूतीला स्थान नाही. म्हणजे भारतीय तत्वज्ञान किंवा अध्यात्म हे अवैज्ञानिक म्हणायचे का? यावर अधिक वाचन केल्यावर मला या दोहोतील साम्य लक्षात आले व अध्यात्मातील वैज्ञानिकता कुठे आहे तेही उमगले. ते इथे थोडक्यांत मांडणार आहे.

भगवान बुद्धाला कोणीतरी विचारले की मला तुमच्या सारखा "बोधीचा" - खर्‍या ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे. बुद्धांनी  त्याला त्याचे राहण्याचे गाव विचारले. ते सांगितल्यावर बुद्ध म्हणाले ‘तू येथून तुझ्या गावाला जाईपर्यंत  वाटेत नदी, डोंगर,  जंगल इत्यादि काय काय लागते ते सांग.’ त्याचे वर्णन ऎकल्यावर बुद्धानी त्याला प्रश्न केला की ‘ तू त्या रस्त्याने जाण्याऎवजी दुसर्‍या रस्त्याने वाटचाल केलीस तर गावापर्यंत पोचशील काय ?’ या प्रश्नाला त्या व्यक्तीने ‘नाही’ असे उत्तर दिले. तेव्हा बुद्ध म्हणाले की मी ज्ञान मिळविण्यासाठी कशी वाटचाल केली हे सांगू शकतो मात्र ज्ञान प्रत्यक्ष काय मिळाले याची अनुभूती फक्त ‘मलाच’ म्हणजे ‘जो या वाटेने जाईल त्यालाच’  होऊ शकते. मी फक्त वाट सांगू शकतो - प्रत्यक्ष बोधी तुलाच मिळवावी लागेल.

याचा अर्थ असा की अध्यात्म्यात प्रगती करण्याचा मार्ग निश्चित असतो. आधुनिक भाषेत बोलायचे तर "प्रोसेस" निश्चित असते, मात्र अनुभूती वैयक्तिक असते. विज्ञानातही प्रयोग-कृती निश्चित असते मात्र येणारे निष्कर्ष प्रत्येकाला सारखेपणाने मिळू शकतात तर अध्यात्मात ते वेगळे येऊ शकतात. तरीही प्रयोग-कृती किंवा प्रोसेस ही निश्चितपणे सारखी असून प्रत्येकाला करता येते आणि प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय सिद्धता येत नाही या दोन कारणांसाठी भारतीय तत्वज्ञान हे देखील वैज्ञानिकच आहे असे माझे मत आहे. एकूण प्रोसेसवरूनही विज्ञानप्रयोगाचे मूल्यमापन होतेच.

विज्ञानात प्रगती करण्यासाठी प्रश्न विचारा. आपली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी घटनेच्या कारणांचा शोध घ्या. त्यासाठी प्रयोग करा. प्रयोगातील पद्धतीची व निष्कर्षांची तपशीलवार नोंद ठेवा. निश्चित स्वरुपाचा निष्कर्ष मिळेपर्यंत चिकाटीने प्रयत्न करा. विज्ञानात नवे संशोधन करण्याचे, त्याचा तंत्रज्ञानात आणि इतरत्र उपयोग करण्याचे स्वप्न बाळगा.

या वर्षाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतात वैज्ञानिक क्रांती करण्याचे आपण ठरवू या.
(शब्दांकन डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली)
----------------------------------------------------------------------------------------------