पर्यावरण सुरक्षिततेसाठी समाजाने एकजुटीने लढावे
|
पणजी : नद्या आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहेत. देशात प्रत्येक नदीला मातेच्या नावाने संबोधले जाते. पृथ्वीवर केवळ ४ टक्के पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. विविध खात्यांतील अनेक सरकारी योजना दुसर्या योजनेला फाटा देते. योजनांमधील लढय़ात सामाजिकरण, पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. योग्य विचार करून पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी एकजुटीने लढा दिल्यास समाज पर्यावरणाचे संरक्षण करण्यास सक्षम बनू शकेल, असे मत गोवा राज्य माहिती आयोगाच्या प्रमुख माहिती आयुक्त लीना मेहंदळे यांनी 'जलसाक्षरता अभियान' कार्यक्रमात मांडले.
'अनाम प्रेम' संस्थेने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 'जलसाक्षरता अभियान'च्या माध्यमातून नद्यांचा महिला जीवनावर होणारा परिणाम व भारतीय संस्कृतीने नद्यांना दिलेला मातृपदाचा मान याविषयी राष्ट्रीय स्तरावर जागृती करण्यासाठी मंगळवारी कला व संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पर्यावरणीय पत्रकारितेत सक्रिय असलेले पुणे जलबिरादरीचे संयोजक सुनील जोशी व पर्यावरणतज्ज्ञ आय.आय.टी.चे केमिकल इंजिनिअर डॉ. उदय शंकर भवाळकर उपस्थित होते. मेहंदळे म्हणाल्या की, पर्वत प्रदक्षिणा आणि नदी परिक्रमा आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून आहेत. वाळू हा पाण्याचा संरक्षक स्तर असतो. आपण आधुनिकतेच्या ओघात भारतीय परंपरा विसरत चाललो आहोत. सरकारने वाळू उपसण्याची परवानगी देताना त्याचा पाण्याच्या पातळीवर परिणाम होणार असल्याचे विसरता कामा नये. पर्यावरण टिकवायचे असेल, तर समाजाने स्वत:पासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. डॉ. भवाळकर म्हणाले, 'बायो सॅनिटायझर इको चिप्स'च्या माध्यमातून समुद्री पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करता येते. निसर्गाची भाषा मनुष्य प्राण्याने शिकल्यास नैसर्गिक आपत्ती रोखता येतील. जे आपल्याला नको ते मातीला परत करा, असा निसर्गाचा सिद्धांत आहे; पण आधुनिक, विज्ञानाच्या आंधळ्या श्रद्धेला बळी पडून निसर्गाच्या विरोधात कार्य करतात. पाणी स्वस्त मिळत असल्याने लापरवाईने वापरण्यात येते, ते महाग केल्यास वाचेल. समुद्राचे खारे पाणी शेतीसाठी वापरता येते. गोव्याला समुद्र संपदा लाभली आहे. यावर संशोधन करून समुद्राचे पाणी शेतीसाठी वापरण्यास यावे. गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर तो कृषिप्रधानही आहे. गोव्यात आताच योग्यप्रकारे पाण्याचे नियोजन न केल्यास अर्थव्यवस्था कोलमडू शकते, अशी शक्यता डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केली. जोशी म्हणाले की, प्रदूषण, शोषण आणि अतिक्रमण यांनी नद्यांना संपविले आहे. गोव्यातील ग्रामीण भाग हा शेती-बागायतीवर अवलंबून आहे; पण गोव्यातील पाण्याची पातळी पाहता चिंताच जाणवते, असे नमूद केले. युवकांनी स्वयंप्रेरित होऊन आपल्या गावातील नद्यांना पुनर्जीवन देण्यासाठी कार्य करावे, असेही त्यांनी सूचविले. कार्यक्रमाला समाजसेविका अलका दामले, प्रेरणा पावसकर उपस्थित होत्या. ज्योती पडाळकर यांनी सूत्रसंचालन केले. अनाम प्रेमचे कार्यकर्ते मीरा सामंत व अँड. सतीश सोनक या वेळी उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------------------------------
|
Wednesday, March 12, 2014
पणजी, जल साक्षरता अभियान अध्यक्षता -रिपोर्ट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment