राष्ट्रीय
विज्ञान दिन -
लीना मेहेंदळे
व्याख्यान
|
सांगली येथे मराठी
विज्ञान प्रबोधिनी या
संस्थेतर्फे राष्ट्रीय
विज्ञानदिनाच्या निमित्त
गोवा राज्याच्या माहिती
आयुक्त लीना मेहेंदळे यांचे
विलिंग्डन कॉलेजमध्ये
व्याख्यान आयोजित करण्यात
आले होते.
त्यावेळी त्यांनी व्यक्त
केलेले विचार लेख स्वरुपात
संपादित केले आहेत.
कोणत्याही युगाची
प्रगति ज्ञान-विज्ञानाच्या
प्रगतीवर अवलंबून असते.
वैज्ञानिक दृष्टिकोण
म्हणजे काय आणि आपल्या देशांत
ही विज्ञान प्रगती कशी होईल
याची चिंता सर्वांनी करावी
अशी आज परिस्थिती आहे.
प्रत्यक्ष प्रयोगाला
विज्ञानात फार महत्व आहे.
मला नववीच्या वर्गात
असताना भौतिकशास्त्र
प्रयोगशाळेतील माझ्या
पहिल्यावहिल्या प्रयोगात
एक उत्तम वस्तुपाठ मिळाला.
वर्गात प्रत्येक
विद्यार्थ्याच्या बाकावर
एक चौकोनी ठोकळा व एक मापनपट्टी
ठेवली होती.
शिक्षकांनी सर्वांना
ठोकळ्याच्या बाजूचे माप काय
असे विचारले.
प्रत्येकाने पट्टीने
कोणतीतरी एक बाजू मोजून उत्तर
लिहिले. शिक्षकानी
सांगितले की केवळ एका बाजूचे
एकदाच माप घेतले तर ते प्रयोगांती
उत्तर होत नाही.
ठोकळ्याच्या सर्व बाजूंची
प्रत्येकी किमान तीन वेळा
मापे घेऊन त्यांची सरासरी
काढली तर अधिक अचूक उत्तर
येईल. म्हणून
एका बाजूचे माप घेणे याला
मापन (Measurement) असे
म्हणायचे तर हेच मापन अधिक
वेळा करून परिणामाची कन्सिस्टंसी
(एकवाक्यता)
तपासणे,
तसेच सर्व बाजूंची मापे
घेऊन सरासरी उत्तर काढणे
म्हणजे मापनाचा वैज्ञानिक
प्रयोग (Experiment)
होय. प्रयोगामधे
वारंवार करून पहाण्याला फार
महत्व असते.
एकदाच केलेले अपुरे किंवा
अवैज्ञानिक ठरेल.
डॉ. सी.
व्ही. रामन
यांनी कलकत्त्यातील छोट्या
प्रयोगशाळॆत प्रयोग करून
नोबेल पारितोषिक मिळविले.
मात्र त्यांच्या नंतर
नोबेल पारितोषिक मिळविलेल्या
सर्व भारतीयांनी परदेशात
संशोधन करून असे यश मिळविले.
भारतात आता आधुनिक सांगितल्या
जाणाऱ्या प्रयोगशाळा आहेत
मात्र नोबेल दर्जाचे संशोधन
का होत नाही याचा विचार
व्हावयास हवा.
ही स्थिती बदलायला हवी.
भविष्यकाळात भारत हा
जगातील सर्वात तरूण देश ठरणार
आहे. कारण
भारतात १५ ते ३५ वर्षांच्या
वयोगटातील लोकांची संख्या
जागतिक लोकसंख्येच्या
प्रमाणात सर्वाधिक असणार
आहे. या
संधीचा फायदा घेऊन भारताला
अग्रेसर करण्यासाठी आपणा
सर्वानी, विशेषतः
विद्यार्थ्यांनी झटले पाहिजे.
शोध घेणे (Investigate),
शोध लावणे (Invention),
विचार करणे (Think)
आणि उपलब्ध ज्ञानाचा योग्य
उपयोग करून (Application)
संशोधनाचा दर्जा वाढविण्याची
गरज आहे. याबरोबरच
विज्ञानातील विविध विद्याशाखात
असणारे परस्पर संबंध दृढ
करून ज्ञानाची व्याप्ती व
उपयुक्तता वाढविली पाहिजे.
यासाठी कॉलेज व विद्यापीठांनी
मोठ्या संख्येने इंटरडिसिप्लिनरी
कोर्सेस वाढवले पाहिजेत.
मेरी क्युरी यांनी
रेडियमचा शोध लावला.
त्यांचे सर्व
प्रयोग किरणोत्सर्गाविषयी
होते.
मात्र त्यांना या
संशोधनाबद्दल रसायनशास्त्राचे नोबेल
पारितोषिक मिळाले होते.
हे लक्षात घेतले
पाहिजे.
याचसाठी विषयांच्या
चौकटीत अभ्यास न करता
आवश्यकतेनुसार इतर विद्याशाखेतील
ज्ञान घेऊन संशोधन परिपूर्ण
करण्याची आवश्यकता आहे.
यासाठी संबंधित
दुसर्या विद्याशाखेतील
मूलभूत संकल्पनांची ओळख
होण्यासाठी कमी अवधीचे शीघ्र
प्रशिक्षण वर्ग (क्रॅश
कोर्सेसही)
आयोजित करण्याची
गरज आहे.
संशोधनासाठी आणखी
एका गोष्टीची गरज आहे.
ती म्हणजे प्रयोगाचे
नोंदीकरण (Documentation).
संशोधनातील टप्पे,
प्रयोगाचे साहित्य,
कृती व मिळालेले
निष्कर्ष यांची तपशीलवार
नोंद ठेवणे अतिशय आवश्यक
आहे.
आपण भारतीय मंडळी
उत्सवप्रिय असतो.
एखाद्या वस्तूचे वा
संशोधनाचे सादरीकरण वा
प्रसिद्धी यासाठी आपण
भरपूर कष्ट घेतो.
मात्र अशा प्रयत्नात
कार्यक्रम संपला की खंड पडतो.
त्यात सातत्य रहात नाही.
परिक्षेच्या वेळचा अभ्यास
परिक्षा संपल्यानंतर आपण
विसरून जातो.
सतत आस लागुन रहाणे व
प्रयत्न करणे म्हणजेच अभ्यास
आहे. संशोधनाला
अशा सातत्याची गरज असते.
भारतात आता बर्याच
मोठ्या संशोधन प्रयोगशाळा
व विज्ञान संग्रहालये उभारण्यात
आली आहेत.
त्यांना भेटी देऊन नव्या
उपकरणांची व विज्ञानशाखांची
आपण माहिती घेतली पाहिजे.
अशा भेटी दिल्या की आपल्या
मनात वैज्ञानिक दृष्टीकोन
निर्माण होण्यास मदत मिळते.
तसेच दीर्घकालीन दृष्टि
तयार होते.
वैज्ञानिकतेचा महत्वाचा
निकष म्हणजे प्रयोगाला
सैद्धांतिक जोड मिळणे.
हायड्रोजन स्पेक्ट्रमवरील
प्रयोगांत दिसून
आलेल्या बामेर लाइन्सची
व्याख्या एका सिद्धांताने
करता आली,
पण त्याच प्रयोगांत
पुढे सापडलेल्या इन्फ्रा
रेड रेंजमधील स्पेक्ट्रमची
व्याख्या करता येइना,
तेंव्हा नवीन
धडाडीच्या सिद्धांताची
मांडणी करून बोर याने व्याख्या
केली आणि अशा रितीने अणुची
संरचना जगाला समजून आली.
संशोधनासाठी चिकाटीची
आवश्यकता असते.
अपयशाने निराश न होता
चिकाटीने प्रयत्न चालू
ठेवल्यास यश मिळते.
पॉझिट्रॉनचा शोध लावण्यासाठी,
वैश्विक किरणात पॉझिट्रॉन
असण्याची शक्यता गृहीत धरून
एका शास्त्रज्ञाने (बहुधा
ब्लेक किंवा अँडरसन)
1920 ते 1930 या
कालखंडात क्लाउडचेंबरवर
वैश्विक किरणांच्या मार्याचे
तब्बल ६०००० फोटों काढले व
त्यांचे परिक्षण केले त्यात
त्याला एका फोटॊत पॉझिट्रॉनचा
मार्ग नोंदला गेल्याचे आढळले.
एवढी चिकाटी ठेवली म्णून
पॉझिट्रॉनचा शोध लागू शकला.
मायकेल्सन याने प्रकाशाचा
वेग मोजला.
मात्र प्रकाशाच्या
संवाहनासाठी इथर नामक माध्यम
असावे लागते अशी धारणा होती
व या इथरचे अस्तित्व पकडण्यासाठी-
समजून येण्यासाठी त्याने
एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाची
संकल्पना मांडली.
ती मला नेहमी थक्क करून
सोडते. या
प्रयोगातून त्याला प्रकाशाचा
वेग अचूकपणे नोंदवता आला
त्याचबरोबर इथर किंवा त्यासदृश
काहीही असूच शकत नाही -
असते तर माझ्या उपकरणांनी
त्याचे अस्तित्व पकडले असते
असे तो ठामपणे सांगू शकला -
त्यातून पुढे आईनस्टाईनने
रिलेटिव्हिटीचा अभूतपूर्व
सिद्धांत मांडला.
या प्रयोगांसाठी मायकेल्सनने
जी सूक्ष्म संवेदनशील उपकरणे
विकसित केली होती त्यासाठी
त्याला नोबेल पारितोषिक
मिळाले. पण
मला विचाराल तर त्याच्या
प्रयोगासाठी आवश्यक
कल्पनाभरारीसाठीही त्याला
पारितोषक मिळायला हवे होते.
अशी कल्पनाभरारीच विज्ञानाला
पुढे नेऊ शकते.
माझ्या पहिल्या
विज्ञानप्रयोगाविषयी तुम्हाला
सांगितले. हा
प्रयोग झाल्यावर दुसर्या
दिवशी शिक्षकांनी असाच प्रयोग
पट्टीच्या सेंटीमीटरऎवजी
इंचाची बाजू वापरून करावयास
सांगितले.
इंचाचा दहावा भाग मिलिमीटरपेक्षा
कितीतरी मोठा असल्याने
ठोकळ्याची बाजू मोजताना
त्याची कड दोन भागचिन्हांच्या
मधे येण्याची शक्यता अधिक
होती अशा वेळी मधल्या मोकळ्या
जागेचे काल्पनिकरीत्या दहा
भाग कल्पून अंदाजे मापन
(Approximation) करता
येते - नव्हे
तसे करायला शिकून घ्यायचे
असते - हे
ठसवण्यासाठी तो प्रयोग होता.
या अंदाज घेण्याच्या
पद्धतीचा उपयोग सामाजिक
शास्त्रात सार्वमताचा कौल
अजमावण्यासाठी केला जातो.
तसेच तुमच्या कित्येक
गणितांमधे अचूक संख्येची
गरज नसून जवळपास काय उत्तर
असेल तेवढा अंदाज घेऊन पुरतो
- अशा
वेळी आपल्याला Approximation
करता यायला हवे.
सर्व शोधांची जननी
जिज्ञासा आहे.
जिज्ञासा पूर्ण झाल्यावर
मिळणारा आनंद संशोधनाला
प्रेरणा देतो.
कोणत्याही गोष्टीवर
अंधविश्वास न ठेवता त्याचे
कारण जाणून घेण्याची प्रवृत्ती,
कां व कसे हे दोन प्रश्न
सतत विचारत रहाणे म्हणजेच
वैज्ञानिक दृष्टीकोन होय.
मात्र हे कारण शोधण्याचा
तुम्ही स्वतः प्रयत्न करणे
जरूर आहे.
दुसर्यांच्या निष्कर्षावर
अवलंबून राहू नका.
सध्या भारतात असे आढळते
की पूर्वी सिद्ध झालेले
प्रयोगच संशोधनासाठी बर्याच
वेळी निवडले जातात.
यात पैसा व श्रम खर्च होऊन
प्रत्यक्ष नवे संशोधन होत
नाही. यासाठी
पुनः चाकाचा शोध लावण्याचा
प्रयत्न करू नका.
मायकेल्सन प्रमाणे नव्या
धर्तीचे प्रयोग मांडायला
शिका.
या ठिकाणी मला अजून
मांडावीशी वाटते ती गोष्ट
म्हणजे अध्यात्म व विज्ञान
यांचा विचार.
भारतीय तत्वज्ञान अध्यात्माकडे
नेणारे असून त्यात वैयक्तिक
अनुभूतीला महत्व दिले जाते
तर विज्ञानात वैयक्तिक
अनुभूतीला स्थान नाही.
म्हणजे भारतीय तत्वज्ञान
किंवा अध्यात्म हे अवैज्ञानिक
म्हणायचे का?
यावर अधिक वाचन केल्यावर
मला या दोहोतील साम्य लक्षात
आले व अध्यात्मातील वैज्ञानिकता
कुठे आहे तेही उमगले.
ते इथे थोडक्यांत मांडणार
आहे.
भगवान बुद्धाला कोणीतरी
विचारले की मला तुमच्या सारखा
"बोधीचा"
- खर्या ज्ञानाचा शोध
घ्यायचा आहे.
बुद्धांनी त्याला त्याचे
राहण्याचे गाव विचारले.
ते सांगितल्यावर बुद्ध
म्हणाले ‘तू येथून तुझ्या
गावाला जाईपर्यंत वाटेत
नदी, डोंगर,
जंगल इत्यादि काय काय
लागते ते सांग.’
त्याचे वर्णन ऎकल्यावर
बुद्धानी त्याला प्रश्न
केला की ‘ तू त्या रस्त्याने
जाण्याऎवजी दुसर्या रस्त्याने
वाटचाल केलीस तर गावापर्यंत
पोचशील काय ?’
या प्रश्नाला त्या व्यक्तीने
‘नाही’ असे उत्तर दिले.
तेव्हा बुद्ध म्हणाले की
मी ज्ञान मिळविण्यासाठी कशी
वाटचाल केली हे सांगू शकतो
मात्र ज्ञान प्रत्यक्ष काय
मिळाले याची अनुभूती फक्त
‘मलाच’ म्हणजे ‘जो या वाटेने
जाईल त्यालाच’ होऊ शकते.
मी फक्त वाट सांगू शकतो
- प्रत्यक्ष
बोधी तुलाच मिळवावी लागेल.
याचा अर्थ असा की
अध्यात्म्यात प्रगती करण्याचा
मार्ग निश्चित असतो.
आधुनिक भाषेत बोलायचे तर
"प्रोसेस"
निश्चित असते,
मात्र अनुभूती वैयक्तिक
असते. विज्ञानातही
प्रयोग-कृती
निश्चित असते मात्र येणारे
निष्कर्ष प्रत्येकाला
सारखेपणाने मिळू शकतात तर
अध्यात्मात ते वेगळे येऊ
शकतात. तरीही
प्रयोग-कृती
किंवा प्रोसेस ही निश्चितपणे
सारखी असून प्रत्येकाला
करता येते आणि प्रत्यक्ष
अनुभूतीशिवाय सिद्धता येत
नाही या दोन कारणांसाठी
भारतीय तत्वज्ञान हे देखील
वैज्ञानिकच आहे असे माझे मत
आहे. एकूण
प्रोसेसवरूनही विज्ञानप्रयोगाचे
मूल्यमापन होतेच.
विज्ञानात प्रगती
करण्यासाठी प्रश्न विचारा.
आपली जिज्ञासा पूर्ण
करण्यासाठी घटनेच्या कारणांचा
शोध घ्या.
त्यासाठी प्रयोग करा.
प्रयोगातील पद्धतीची व
निष्कर्षांची तपशीलवार नोंद
ठेवा. निश्चित
स्वरुपाचा निष्कर्ष मिळेपर्यंत
चिकाटीने प्रयत्न करा.
विज्ञानात नवे संशोधन
करण्याचे,
त्याचा तंत्रज्ञानात आणि
इतरत्र उपयोग करण्याचे स्वप्न
बाळगा.
या वर्षाच्या राष्ट्रीय
विज्ञान दिनानिमित्त भारतात
वैज्ञानिक क्रांती करण्याचे
आपण ठरवू या.
(शब्दांकन
डॉ. सु.
वि. रानडे,
ज्ञानदीप फौंडेशन,
सांगली)
----------------------------------------------------------------------------------------------
|
No comments:
Post a Comment