मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, June 29, 2014

अनिल गोरे यांचे प्रयत्न

एका प्राचार्यांचे आभार! 
२००८ वर्षी मी इ. ११ वी विज्ञान शाखेचा प्रवेश अर्ज मराठीतून असलाच पाहिजे म्हणून जोरदार मागणी केली. त्या मागणीबाबत थोडी खडाजंगी होऊन अखेर ती मागणी २०१० मध्ये मान्य करताना प्रवेश समितीचे अध्यक्ष असलेले प्राचार्य मला म्हणाले, " नुसता अर्ज मराठीत करा म्हणून भांडलात, नियम दाखवलात, पण विज्ञान शिक्षण कोठे मराठीतून मिळते?" या वाक्याने मी निराश झालो नाही, तर ११ वी विज्ञान शाखेचे वर्ग मराठीतून कसे सुरु होतील, याचे प्रयत्न दुसऱ्या दिवसापासून सुरु केले. अनेक इंग्रजीधार्जिण्या पुणेकरांना ही कल्पनाच अगोदर वेडेपणाची वाटली आणि माझी या पुण्यात भरपूर टिंगलटवाळी झाली पण यावर्षी ती कल्पना प्रत्यक्षात उतरली.
वरील वाक्य उच्चारणाऱ्या त्या प्राचार्यांचे आभार ! त्यांची प्रेरणा उपयुक्त ठरून आता माझ्या मागणीवरून आणि पाठपुराव्याने अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) पदविका शिक्षण देखील मराठीतून मिळण्याची सोय झाली. मराठीकाका, अनिल गोरे


  • Bharat Karmarkar या सुविधेला समाजाने प्रतिसाद द्यायला हवा. समाजाची एक अडचण अशी असते की समूहशिक्षणाच्या आपल्या व्यवस्था दर्जेदार नाहीत. त्यामुळे व्यक्तिगत किंवा लहान गटात शिकवण्या घेणारे लोक पालकांना हवे असतात. मराठी माध्यमातून ११वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेणा-या फक्त तीन मुले किंवा फक्त तीन मुली यांच्यासाठी मी हे काम करू शकेन.
  • लीना मेहेंदळे आज पुणे शहराच्या बाहेर गांवात गेलात तर बहुतेक प्राध्यापकांना मराठीतून विज्ञान शिक्षण शिकवणें जमणार आहे फक्त 2 अडचणी -- पारिभाषिक शब्द तोंडात बसायला थोडा वेळ लागेल. दुसरी अडचण मोठी आहे. जे सिद्धांत म्हणून इंग्रजीतून कमीतकमी शब्दात नेटकेपणे मांडलेले असतात (उदा आर्किमिडिस प्रिन्सिपल) ते समजले नसतील तर त्यांना तशाच नेमकेपणाने मराठीत मांडता येत नाही. इतरांना समजूनही देता येत नाही. ते प्राध्यापक इंग्रजीतूनच शिकवायला बघतात कारण पाठ करा रे म्हटलं की झालं. यासाठी अशा प्राध्यापकांसाठी शिकवण कार्यशाळा घेण्याची गरज राहील.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची एक मोठी आवश्यकता पूर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रम (DME, DEE, DCE वगैरे ) यासह सुमारे २०० हून अधिक पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम ज्यांना मराठी या प्रगत, समृद्ध, संपन्न भाषेतून शिकायचे असतील, त्यांना ते मराठीतून शिकवण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मा. ना. राजेश टोपे यांनी जाहीर केला. यासाठी लागणारी मराठी पुस्तके आणि मराठीतून शिकणारा शिक्षक वर्ग अल्पकाळात प्रशिक्षित करून राज्यातील विद्यार्थ्यांना प्रगत मराठी भाषेतून तांत्रिक शिक्षण मिळण्यासाठी हजारो शिक्षितांचा सहभाग आवश्यक आहे. यात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा. यात मोठे नाव आणि भरपूर पैसाही मिळणार यात काही शंका नाही. - अनिल गोरे., मराठीकाका.
फार उशीर नाही. अजून तरी ८० % विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेत जातात आणि
असे निर्णय झाल्यावर आता मराठी मध्यम नाकारण्याची वेळ येणार नाही.
मराठी मध्यामच्या शाळेत मुलांना घालायला निघालेल्या पालकांना " १० वी पुढचे

शिक्षण मराठीत नाही, पुढे काय करशील ?" हा प्रश्न गेली दीडशे वर्ष निरुत्तर
करीत होता. आता असे पालक निरुत्तर होणार नाहीत आणि मोकळेपणाने मराठी माध्यमाची
निवड करू शकतील. - अनिल गोरे, मराठीकाका.

------------------------------------------------------------------------------------------------------

निवेदन
मराठी माध्यमातून इ. ११ वी विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेण्याचा पर्याय शिक्षण उपसंचालक, पुणे यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ११ वी प्रवेश प्रक्रियेत उपलब्ध करून दिला. ११ वी विज्ञान शाखेतील मराठी माध्यमासाठी ८० जागा उपलब्ध असताना हा पर्याय निवडण्यासाठी ८३३ आवेदनपत्रे भरली गेली आहेत. ११ वी विज्ञान शाखेत मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी ज्यांनी अर्ज केलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मेळावे समर्थ मराठी संस्था आणि मराठी आयोजित केला जाणार असून अशा विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विनामूल्य मेळाव्याला येण्यासाठी नावनोंदणी करावी, हे आवाहन ! नावनोंदणीसाठी ११ वी मराठी माध्यम असे लिहून पुढे आपला दूरध्वनी/ भ्रमणध्वनी क्र. तसेच नाव पुढील क्रमांकावर संदेश (SMS) पाठवावा. मेळाव्याची वेळ आणि ठिकाण कळविले जाईल.
संपर्क - मराठीकाका, प्रा. अनिल गोरे. अध्यक्ष - समर्थ मराठी संस्था ७०५ बुधवार पेठ, पुणे ४११०३० भ्र. ९४२२००१६७१. आणि प्रा. विनय र.र. कार्याध्यक्ष मराठी विज्ञान परिषद टिळकस्मारक मंदिर आवार, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. ९४२२०४८९६७
---------------------------------------------------------------------------------------
११ वी विज्ञान शाखेसाठी अधिकृतपणे मराठी माध्यमाचा पर्याय उपलब्ध झाल्यावर उपलब्ध जागांपेक्षा दहापटीहून अधिक प्रतिसाद लाभला. येत्या दोन वर्षात मराठी माध्यमातून ११ वी १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखाहून अधिक होण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. प्रगत, समृद्ध, संपन्न मराठीतून विज्ञान शिकून नवे संशोधन, नवे संशोधक महाराष्ट्रात आढळतील, यासाठी सर्वांनी पाठींबा द्यावा. - मराठीकाका, अनिल गोरे.
सोबतची बातमी लोकसत्ता पण ४ दी. २६ /६/२०२४ या अंकातील आहे.


















-शाळेत मराठीतून विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेली दीडशे वर्षे पुढील विज्ञान शाखेतील शिक्षण घेताना प्रवेशाच्या वेळी विज्ञान शाखेसाठी मराठी माध्यमाचा पर्याय उपलब्ध नसे, म्हणून इच्छा नसतानाही लाखो लोकांनी या शाखेत इंग्रजी माध्यमाला नाईलाजाने प्रवेश घेतला. गेली सात वर्षे मी सरकारकडे पाठपुरावा केला त्याला यश मिळून यावर्षी (जून २०१४) पुणे विभागात मराठी माध्यम विज्ञान प्रवेशासाठी ८० जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यासाठी ८३३ अर्ज आले आहेत. या सर्व ८३३ जणांना विज्ञान मराठी माध्यमात प्रवेश मिळावा यासाठी मी आजपासून पाठपुरावा सुरु केला आहे, मराठीप्रेमींनी यासाठी सहकार्य करावे- . या ऐतिहासिक घटनेचे स्वागत आणि शासनाचे आभार !मराठीकाका, अनिल गोरे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी हे शिक्षणासाठी उत्तम माध्यम आहे. कोणत्याही शिकवणीचे शुल्क भरणे परवडत नसलेले मराठी माध्यमाचे विद्यार्थी इ. १० वी परीक्षेत आपापल्या गावात ९४ - ते ९७ % हून अधिक गुण घेऊन पहिल्या क्रमांकाने यशस्वी झाले.(या यशाची माहिती देणारी मालिका रोज झी मराठीवर दाखवली जाते. ) लाखो रुपयांचे शाळा शुल्क आणि हजारो रुपयांचे शिकवणी शुल्क भरणाऱ्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इतके झळझळीत यश मिळालेले नाही. इंग्रजी माध्यम विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी निराश होऊ नये, इंग्रजी माध्यम निवडून आपण केलेली भयंकर चूक सुधारणे शक्य आहे, हे समजून घ्यावे. चूक सुधारण्यासाठी आजच इ. २ री पासूनची सर्व विषयांची मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके घरी आणा आणि आपल्या इंग्रजी माध्यमातील मुलांच्या अभ्यासाची एक उजळणी प्रगत, समृद्ध, संपन्न मराठी भाषेतून करून घ्या. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांबाबत होणारे आपले अपरिमित नुकसान टाळण्याचा हा एकमेव आणि प्रभावी मार्ग महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषकांनी ( विशेषत: मुलांना आग्रहाने इंग्रजीत माध्यमात घातलेल्या महिला पालकांनी ) अवश्य अनुसरावा, हे आवाहन ! - अनिल गोरे.

अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड विभागाने ११ वी विज्ञान शाखेतील मराठी माध्यमाचे वर्ग सुरु करण्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या दोनशे वर्षात शाळेच्या शिक्षणानंतर ११ वी विज्ञान शाखेत मराठी मध्यम घेऊन शिकण्याची सोय नव्हती, ती आता श्रीमती सुमन शिंदे : शिक्षण उपसंचालक , पुणे यांनी उपलब्ध करून दिली आहे. ज्यांना ११ वी विज्ञान (सायन्स) च्या वर्गात सर्व विषय मराठीतून शिकायचे असतील, त्यांनी अर्ज भरताना हा पर्याय निवडावा, हे आवाहन ! महाराष्ट्राचे प्रगतीकडे पडलेल्या या पहिल्या पावलाचे स्वागत करा. मराठीकाका, अनिल गोरे.

ग.रा.पालकर नावाची एक मराठी शाळा आहे, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे येथे... शाळा उत्तम आहे. फार अडचणीतून ही शाळा वरती येत आहे. कालच १०वीचा निकाल लागला त्यात ह्या शाळेचा निकाल १००% लागला आहे. ही शाळा उत्तम आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. ... ह्या मराठी शाळेच्या काही मुलांना तुमची मदत हवी आहे. वह्या, शैक्षणिक साहित्य अशी ती मदत आहे. . जरूर जरूर संपर्क साधा... मंजिरी जाधव ९७३००३३४१२. अगदी कदाचित वर्गात शिकवत असल्या तर त्या फोन घेऊ शकणार नाहीत, तसं झालं तर पुन्हा प्रयत्न करा आणि शाळेला भेटही द्या. इंग्रजी शाळांच्या फुकाच्या दिमाखात आपणच मराठी शाळांना ताकद दिली पाहिजे... जय महाराष्ट्र! अनिल गोरे.

भारतीय भाषेतून शिकल्याचा प्रचंड लाभ !
राम, शाम यादव नावाचे उत्तर भारतातील दोन बंधू महापालिकेच्या शाळेत हिंदी या भारतीय भाषेत शिकले. ११ वी, १२ वी ला त्यांनी हिंदी या भारतीय भाषेतून भौतिक, रसायन, गणित विषय शिकले. आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या वर्गांचे अफाट शुल्क देण्याची त्यांची ऐपत नव्हती. त्यांनी स्वत:ला समजणाऱ्या हिंदीतून अभ्यास केला आणि या प्रवेश परीक्षेच्या दोन्ही टप्प्यात ४०० व्या क्रमांकाच्या आत क्रमांक पटकावला. इंग्रजीवर १०० % अवलंबून राहिलेले हजारो पुणेकर विद्यार्थी मात्र तुलनेने फार कमी यश मिळवू शकले आहेत. पुण्यातील विद्यार्थ्यांना अधिक यश मिळण्यासाठी भारतीय भाषांमधून अभ्यास आणि प्रवेश परीक्षा हा दुहेरी उपाय उपयुक्त ठरेल. या पद्धतीची उपयुक्तता मी आयआयटी च्या संबंधित अधिकार्यांना पटवून दिल्यावर २०१४ पासून त्यांनी IIT JEE mains ani advance या दोन्ही परीक्षा मराठी या प्रगत, समृद्ध, संपन्न भाषेतून देण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. - मराठीकाका, अनिल गोरे.

मराठी पाउल आणखी पुढे!
मागासलेली इंग्रजी भाषा आणि दरिद्री रोमन लिपी यामुळे कोणत्याही अभ्यासक्रमातील इंग्रजी पुस्तकांचा अभ्यास करताना मराठीच्या तुलनेत दुप्पट ते पाचपट शब्द आणि तिप्पट ते आठपट अक्षरे वाचणे, लिहिणे, लक्षात ठेवणे भाग पडते. अभ्यासाला अधिक वेळ लागतो, अधिक कंटाळा येतो आणि त्यामुळे विषयाचे आकलन विद्यार्थ्याच्या क्षमतेपेक्षा कमी होते. काही विषयांचा अभ्यास इंग्रजी पुस्तकातून करणे भाग पडत होते कारण संबंधित मराठी पुस्तकेच नव्हती. मी ११ वी, १२ वी विज्ञान शाखेतील भौतिक, रसायन, जीवशास्त्राची मराठी पाठ्यपुस्तके निर्माण केली.
इंग्रजी पुस्तकातून क्षमतेपेक्षा कमी आकलन होणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी शाळेत इंग्रजीतून शिकतानाच ही मराठी पुस्तके वापरून अपेक्षेपेक्षा थोडे अधिक यश मिळवले. १२ वीतील अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
कालच ही मराठी पुस्तके परेश ठाकूर ७३८३१२५१२३ या सुरतमधील माणसाने पुण्याहून मागविली. गुजरातेतील शाळा, महाविद्यालयात जिथे मागासलेली इंग्रजी भाषा हे माध्यम असले तरी शिक्षक सर्व भाग गुजराती या प्रगत भारतीय भाषेतून समजावून देतात, म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांना विषय उत्तम कळतात. तिथल्या मराठी विद्यार्थ्यांना या दोन्ही भाषांपेक्षा मराठी अधिक उपयुक्त ठरत असल्याने आता गुजरातेतील मराठी भाषक विद्यार्थी यापुढे मराठी पुस्तकांचाही आधार घेऊ लागली आहेत.
विषय कळत नसला तरी इंग्रजीतून शिकत राहणे हा काही प्रगतीचा चांगला मार्ग नव्हे, तर अधिक चांगले कळण्यासाठी कोणत्याही विषयाशी संबंधित मराठी पुस्तके वाचून अधिक चांगले आकलन करून घेणे हा स्वत:चे भले करण्याचा उत्तम मार्ग आहे. -अनिल गोरे.

मी काल प्रसिद्ध केलेली पेरूगेट भावे शाळा, पुणे येथील स्थितीची माहिती मिळाल्यावर राज्यभरातील तीन प्राध्यापकांनी माझ्याशी संपर्क साधला. ते येत्या जूनपासून त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्येक तासाला जे काही इंग्रजीतून शिकवतील तेच पुन्हा मराठीतून समजावून देणार आहेत. पालकांच्या हव्यासापोटी अधिकृत माध्यम इंग्रजी ठेवून मग मुलांच्या हितासाठी, प्रगतीसाठी अनौपचारिक रीत्या मराठी माध्यम वापरणे ही माझी सूचना त्यांना भलतीच आवडली आहे. चला, त्यांचे अनुकरण करू ! ही पद्धत मी स्वत: गेली अनेक वर्षे वापरत असून त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले. 2013 मध्ये IIT - JEE ला पहिला आलेला विद्यार्थी यश भळगट हा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी माझ्याकडे अशाच प्रकारे शिकला होता. - प्रा. अनिल गोरे.

मराठी माध्यमाचे सामर्थ्य !

पुण्यातील पृथ्वी नावाचा एक शिकवणी वर्ग राज्य आणि केंद्र लोकसेवा आयोग परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग चालवतो. या वर्गातील तीस जण यंदा राज्य सेवा परीक्षेत यशस्वी झाले. हे सर्वजण १ ली पासून १० वी पर्यंत मराठी माध्यमात शिकले. कोवळ्या वयात मराठी या प्रगत, समृद्ध आणि संपन्न भाषेत शिकल्यामुळे त्यांना असे मोठे यश मिळाले.

शेजारच्या आया - बायांचे अर्धवट ज्ञानाने भरलेले शेरे ऐकून पिडलेल्या काही पालकांनी वीस पंचवीस वर्षापूर्वी आपली मुले इंग्रजी माध्यमात घातली होती, तशी दुर्दैवी मुले देखील या शिकवणी वर्गात तेच प्रशिक्षण घेत होती. १ ली ते १० वी इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या त्यातील कोणालाही असे यश इंग्रजी भाषा या विषयात देखील मिळाले नाही. या दुर्दैवी मुलांनी दोन महिने धडपड करून मराठी भाषेवर पकड मिळवली तर त्यांना पुढची परीक्षा मराठीतून लिहिता येईल शिवाय त्यांची इंग्रजीही सुधारेल आणि त्यांना अधिक यश देखील मिळेल असे वाटते. - मराठीकाका, अनिल गोरे.

गेल्या काही दिवसातील शैक्षणिक माध्यमाबाबतची चर्चा पाहून काही सधन तरुण पालक आपल्या चिमुकल्या तीन वर्षीय मुलांना मराठी माध्यमात घालण्याची इच्छा व्यक्त करू लागले आहेत. मराठीतून ११ वी आणि १२ वी सायन्स चा अभ्यास आणि परीक्षा दोन्ही शक्य आहे हे कळल्यावर संजय गोडबोले या सधन पालकाने २०१० मध्येच आपल्या मुलाला मराठी शाळेत घातले. आपला मुलगा ११ वी ला जाईपर्यंत ११ वी, १२ वी तसेच इंजि/ मेडिकल सह सर्व अभ्यासक्रमात मराठी माध्यम रुजलेले असावे, म्हणून मी निर्माण करत असलेल्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकासाठी त्यांनी मला २५००० रुपयांचे बेमुदत, बिनव्याजी कर्ज दिले. ते पुस्तक निर्माण झाल्यावर आपले पैसे लगेच परत न घेता त्यांनी मला ते पैसे इतर मराठी पुस्तके निर्माणासाठी वापरायची सूचना केली. आता भौतिकशास्त्र, रसायन आणि जीवशास्त्राची ११ वी, १२ वीची पुस्तके तयार असून आम्ही १ फेब्रु. २०१४ पासून इंजि ची मराठी पुस्तके निर्मितीचा प्रकल्प सुरु करीत आहोत. आता यापुढे नुसता फेसबुक पाठींबा न देता या प्रकल्पात लेखक म्हणून सहभाग घ्यावा हे सर्व तज्ञांना आवाहन ! या सहभागात पैशापेक्षा मराठीतून इंजि च्या विषयांचे लेखनासाठी सहकार्य हवे आहे. - मराठीकाका, अनिल गोरे.

झटपट कळणे हा मराठी भाषेचा अंगभूत गुण असून शक्यतोवर लवकर काहीही न समजणे हा इंग्रजी शब्द समूहाचा अंगभूत विशेष गुण आहे. मराठीच्या या गुणाचा लाभ इंग्रजी माध्यमातील मुलांनाही मिळावा म्हणून मी 'वेगाभ्यास' पद्धती विकसित केल्या आहेत. अधिकाधिक लोकांनी आपल्या भाषिक अंधश्रद्धा बाजूला ठेवून आपल्या मुलांचे भले करून घ्यावे. आपली मुले इंग्रजी माध्यमात एखाद्या इयत्तेत असतील तर त्यांना १ ली पासून त्या इयत्तेपर्यंतची सर्व विषयांची मराठी माध्यमातील पुस्तके आणून द्यावी आणि त्याही पुस्तकांचा नीट अभ्यास करायला लावावा. समृद्ध मराठी भाषेचा स्पर्श मोठे यश मिळवून देऊ शकतो. - मराठीकाका, अनिल गोरे.

११ वी, १२ वी अभ्यासक्रमातील भौतिक(फिजिक्स) रसायन केमिस्ट्री) जीव (बायोलोजी) आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिका १९७७ पासून दरवर्षी मराठीतून काढल्या जातात. मराठीतून उत्तरे लिहिण्याचा पर्याय जे विद्यार्थी परीक्षा अर्जात निवडतात, त्यांना मराठी प्रश्नपत्रिका मिळते, त्यातील प्रश्नांची मराठीत उत्तरे लिहिता येतात. वरील चार विषयांच्या ऑक्टो.2013 मधील प्रश्नपत्रिका ज्यांना पाहायला हव्या असतील त्यांनी कृपया marathikaka@gmail.com या पत्त्यावर आपली मागणी करावी. काही तांत्रिक अडचणीमुळे(अज्ञानामुळे ) मला मी बनवलेला नमुना फेसबुकवर प्रदर्शित करता येत नाही., पण मी कोणालाही त्यांच्या वी पत्त्यावर (इमेलवर) हा संच पाठवून देईन अधिक माहितीसाठी www.samarthmarathi.com वर लेख हा विभाग पहावा. हे तीपण वाचणार्या प्रत्येकाने या मराठी प्रश्नपत्रिका प्रत्येक १२ वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती! -अनिल गोरे.

माझ्या सहा वर्षांच्या प्रयत्नाला यश आले. मुंबई शहरातील चि. प्रणित दबडे हा IIT-JEE साठी मराठी प्रश्नपत्रिकेची मागणी करणारा पहिला विद्यार्थी आहे. मराठी या प्रगत भाषेतून IIT-JEE देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रणितचे अभिनंदन! याच परीक्षेत गुजराती भाषेत प्रश्नपत्रिका मिळावी, म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सतत प्रयत्न करत होते. त्यांच्या पदामुळे त्यांची मागणी लवकर मान्य होऊन तीन वर्षांपासून गुजरात राज्यातील केंद्र निवडणार्या विद्यार्थ्यांना वरील परीक्षेत गुजराती शब्दांसह गुजराती प्रश्नपत्रिका मिळू लागली आहे. मी त्या मानाने लहान कार्यकर्ता असून मनात असलेली तळमळ सोडून इतर काही सामर्थ्य नसल्याने मराठी शब्दांसह मराठी प्रश्नपत्रिका मिळावी ही माझी मागणी तीन वर्षे उशिरा मान्य झाली.
आजपर्यंत ८५ विद्यार्थ्यांनी मराठीचा पर्याय निवडला. लवकरच ही संख्या वाढेल. या परीक्षेसाठी सध्या मराठी पुस्तके नाहीत टी पुढील वर्षी मी उपलब्ध करून देणार आहे. - मराठीकाका,अनिल गोरे




























Wednesday, March 12, 2014

पणजी, जल साक्षरता अभियान अध्यक्षता -रिपोर्ट

पर्यावरण सुरक्षिततेसाठी समाजाने एकजुटीने लढावे
पणजी : नद्या आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहेत. देशात प्रत्येक नदीला मातेच्या नावाने संबोधले जाते. पृथ्वीवर केवळ ४ टक्के पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. विविध खात्यांतील अनेक सरकारी योजना दुसर्‍या योजनेला फाटा देते. योजनांमधील लढय़ात सामाजिकरण, पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. योग्य विचार करून पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी एकजुटीने लढा दिल्यास समाज पर्यावरणाचे संरक्षण करण्यास सक्षम बनू शकेल, असे मत गोवा राज्य माहिती आयोगाच्या प्रमुख माहिती आयुक्त लीना मेहंदळे यांनी 'जलसाक्षरता अभियान' कार्यक्रमात मांडले.
'अनाम प्रेम' संस्थेने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 'जलसाक्षरता अभियान'च्या माध्यमातून नद्यांचा महिला जीवनावर होणारा परिणाम व भारतीय संस्कृतीने नद्यांना दिलेला मातृपदाचा मान याविषयी राष्ट्रीय स्तरावर जागृती करण्यासाठी मंगळवारी कला व संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पर्यावरणीय पत्रकारितेत सक्रिय असलेले पुणे जलबिरादरीचे संयोजक सुनील जोशी व पर्यावरणतज्ज्ञ आय.आय.टी.चे केमिकल इंजिनिअर डॉ. उदय शंकर भवाळकर उपस्थित होते.
मेहंदळे म्हणाल्या की, पर्वत प्रदक्षिणा आणि नदी परिक्रमा आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून आहेत. वाळू हा पाण्याचा संरक्षक स्तर असतो. आपण आधुनिकतेच्या ओघात भारतीय परंपरा विसरत चाललो आहोत. सरकारने वाळू उपसण्याची परवानगी देताना त्याचा पाण्याच्या पातळीवर परिणाम होणार असल्याचे विसरता कामा नये. पर्यावरण टिकवायचे असेल, तर समाजाने स्वत:पासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. भवाळकर म्हणाले, 'बायो सॅनिटायझर इको चिप्स'च्या माध्यमातून समुद्री पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करता येते. निसर्गाची भाषा मनुष्य प्राण्याने शिकल्यास नैसर्गिक आपत्ती रोखता येतील. जे आपल्याला नको ते मातीला परत करा, असा निसर्गाचा सिद्धांत आहे; पण आधुनिक, विज्ञानाच्या आंधळ्या श्रद्धेला बळी पडून निसर्गाच्या विरोधात कार्य करतात. पाणी स्वस्त मिळत असल्याने लापरवाईने वापरण्यात येते, ते महाग केल्यास वाचेल. समुद्राचे खारे पाणी शेतीसाठी वापरता येते. गोव्याला समुद्र संपदा लाभली आहे. यावर संशोधन करून समुद्राचे पाणी शेतीसाठी वापरण्यास यावे. गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर तो कृषिप्रधानही आहे. गोव्यात आताच योग्यप्रकारे पाण्याचे नियोजन न केल्यास अर्थव्यवस्था कोलमडू शकते, अशी शक्यता डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केली.
जोशी म्हणाले की, प्रदूषण, शोषण आणि अतिक्रमण यांनी नद्यांना संपविले आहे. गोव्यातील ग्रामीण भाग हा शेती-बागायतीवर अवलंबून आहे; पण गोव्यातील पाण्याची पातळी पाहता चिंताच जाणवते, असे नमूद केले. युवकांनी स्वयंप्रेरित होऊन आपल्या गावातील नद्यांना पुनर्जीवन देण्यासाठी कार्य करावे, असेही त्यांनी सूचविले.
कार्यक्रमाला समाजसेविका अलका दामले, प्रेरणा पावसकर उपस्थित होत्या. ज्योती पडाळकर यांनी सूत्रसंचालन केले. अनाम प्रेमचे कार्यकर्ते मीरा सामंत व अँड. सतीश सोनक या वेळी उपस्थित होते. 
----------------------------------------------------------------------------------------------

Monday, March 3, 2014

वैदिक गणित के सोलह सूत्र

जगद्गुरू स्वामी भारती कृष्ण तीर्थ द्वारा विरचित वैदिक गणित अंकगणितीय गणना की वैकल्पिक एवं संक्षिप्त विधियों का समूह है। इसमें १६ मूल सूत्र दिये गये हैं। वैदिक गणित गणना की ऐसी पद्धति है, जिससे जटिल अंकगणितीय गणनाएं अत्यंत ही सरल, सहज व त्वरित संभव हैं। स्वामीजी ने इसका प्रणयन बीसवीं शती के आरम्भिक दिनों में किया।...

From facebook post of Harshvardhan Pandit --
स्वामीजी के एकमात्र उपलब्ध गणितीय ग्रंथ ‘वैदिक गणित' या 'वेदों के सोलह सरल गणितीय सूत्र’ के बिखरे हुए संदर्भों से छाँटकर डॉ. वासुदेव शरण अग्रवाल ने सूत्रों तथा उपसूत्रों की सूची ग्रंथ के आरंभ में इस प्रकार दी है—
1. एकाधिकेन पूर्वेण
2. निखिलं नवतश्चरमं दशतः
3. ऊर्ध्वतिर्यग्भ्याम्
4. परावर्त्य योजयेत्
5. शून्यं साम्यसमुच्चये
6. (आनुरूप्ये) शून्यमन्यत्
7. संकलनव्यवकलनाभ्याम्
8. पूरणापूरणाभ्याम्
9. चलनकलनाभ्याम्
10. यावदूनम्
11. व्यष्टिसमष्टिः
12. शेषाण्यङ्केन चरमेण
13. सोपान्त्यद्वयमन्त्च्यम्
14. एकन्यूनेन पूर्वेण
15. गुणितसमुच्चयः
16. गुणकसमुच्चयः

Sunday, March 2, 2014

राष्ट्रीय विज्ञान दिन - लीना मेहेंदळे व्याख्यान


राष्ट्रीय विज्ञान दिन - लीना मेहेंदळे व्याख्यान
सांगली येथे मराठी विज्ञान प्रबोधिनी या संस्थेतर्फे राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या निमित्त गोवा राज्याच्या माहिती आयुक्त लीना मेहेंदळे यांचे विलिंग्डन कॉलेजमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले विचार लेख स्वरुपात संपादित केले आहेत.
कोणत्याही युगाची प्रगति ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असते. वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे काय आणि आपल्या देशांत ही विज्ञान प्रगती कशी होईल याची चिंता सर्वांनी करावी अशी आज परिस्थिती आहे. प्रत्यक्ष प्रयोगाला विज्ञानात फार महत्व आहे. मला नववीच्या वर्गात असताना भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील माझ्या पहिल्यावहिल्या प्रयोगात एक उत्तम वस्तुपाठ मिळालावर्गात प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाकावर एक चौकोनी ठोकळा व एक मापनपट्टी ठेवली होती. शिक्षकांनी सर्वांना ठोकळ्याच्या बाजूचे माप काय असे विचारले. प्रत्येकाने पट्टीने कोणतीतरी एक बाजू मोजून उत्तर लिहिले. शिक्षकानी सांगितले की केवळ एका बाजूचे एकदाच माप घेतले तर ते प्रयोगांती उत्तर होत नाही. ठोकळ्याच्या सर्व बाजूंची प्रत्येकी किमान तीन वेळा मापे घेऊन त्यांची सरासरी काढली तर अधिक अचूक उत्तर येईल. म्हणून एका बाजूचे माप घेणे याला मापन (Measurement) असे म्हणायचे तर हेच मापन अधिक वेळा करून परिणामाची कन्सिस्टंसी (एकवाक्यता) तपासणे, तसेच सर्व बाजूंची मापे घेऊन सरासरी उत्तर काढणे म्हणजे मापनाचा वैज्ञानिक प्रयोग (Experiment) होय. प्रयोगामधे वारंवार करून पहाण्याला फार महत्व असते. एकदाच केलेले अपुरे किंवा अवैज्ञानिक ठरेल.

डॉ. सी. व्ही. रामन यांनी कलकत्त्यातील छोट्या प्रयोगशाळॆत  प्रयोग करून नोबेल पारितोषिक मिळविले. मात्र त्यांच्या नंतर नोबेल पारितोषिक मिळविलेल्या  सर्व भारतीयांनी परदेशात संशोधन करून असे यश मिळविले. भारतात आता आधुनिक सांगितल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा आहेत मात्र नोबेल दर्जाचे  संशोधन का होत नाही याचा विचार व्हावयास हवा. ही स्थिती बदलायला हवी.

भविष्यकाळात भारत हा जगातील सर्वात तरूण देश ठरणार आहे. कारण भारतात १५ ते ३५ वर्षांच्या वयोगटातील लोकांची संख्या जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक असणार आहे. या संधीचा फायदा घेऊन भारताला अग्रेसर करण्यासाठी आपणा सर्वानी, विशेषतः विद्यार्थ्यांनी झटले पाहिजे. शोध घेणे (Investigate), शोध लावणे (Invention), विचार करणे (Think) आणि उपलब्ध ज्ञानाचा योग्य उपयोग करून (Application) संशोधनाचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. याबरोबरच विज्ञानातील विविध विद्याशाखात असणारे परस्पर संबंध दृढ करून ज्ञानाची व्याप्ती व उपयुक्तता वाढविली पाहिजे. यासाठी कॉलेज व विद्यापीठांनी मोठ्या संख्येने इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस वाढवले पाहिजेत.

मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. त्यांचे सर्व प्रयोग किरणोत्सर्गाविषयी होते. मात्र त्यांना या संशोधनाबद्दल रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक  मिळाले होते. हे लक्षात घेतले पाहिजे. याचसाठी विषयांच्या चौकटीत अभ्यास न करता आवश्यकतेनुसार इतर विद्याशाखेतील ज्ञान घेऊन संशोधन परिपूर्ण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी संबंधित दुसर्‍या विद्याशाखेतील मूलभूत संकल्पनांची ओळख होण्यासाठी कमी अवधीचे शीघ्र प्रशिक्षण वर्ग (क्रॅश कोर्सेसही) आयोजित करण्याची गरज आहे.

संशोधनासाठी आणखी एका गोष्टीची गरज आहे. ती म्हणजे प्रयोगाचे नोंदीकरण (Documentation). संशोधनातील टप्पे, प्रयोगाचे साहित्य, कृती व मिळालेले निष्कर्ष यांची तपशीलवार नोंद ठेवणे अतिशय आवश्यक आहे. आपण भारतीय मंडळी उत्सवप्रिय असतो. एखाद्या वस्तूचे वा संशोधनाचे सादरीकरण वा प्रसिद्धी यासाठी  आपण भरपूर कष्ट घेतो. मात्र अशा प्रयत्नात कार्यक्रम संपला की खंड पडतो. त्यात सातत्य रहात नाही. परिक्षेच्या वेळचा अभ्यास परिक्षा संपल्यानंतर आपण विसरून जातो. सतत आस लागुन रहाणे व प्रयत्न करणे म्हणजेच अभ्यास आहे. संशोधनाला अशा सातत्याची गरज असते.

भारतात आता बर्‍याच मोठ्या संशोधन प्रयोगशाळा व विज्ञान संग्रहालये उभारण्यात आली आहेत. त्यांना भेटी देऊन नव्या उपकरणांची व विज्ञानशाखांची आपण माहिती घेतली पाहिजे. अशा भेटी दिल्या की आपल्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत मिळते. तसेच दीर्घकालीन दृष्टि तयार होते.

वैज्ञानिकतेचा महत्वाचा निकष म्हणजे प्रयोगाला सैद्धांतिक जोड मिळणे. हायड्रोजन स्पेक्ट्रमवरील प्रयोगांत दिसून आलेल्या बामेर लाइन्सची व्याख्या एका सिद्धांताने करता आली, पण त्याच प्रयोगांत पुढे सापडलेल्या इन्फ्रा रेड रेंजमधील स्पेक्ट्रमची व्याख्या करता येइना, तेंव्हा नवीन धडाडीच्या सिद्धांताची मांडणी करून बोर याने व्याख्या केली आणि अशा रितीने अणुची संरचना जगाला समजून आली.

संशोधनासाठी चिकाटीची आवश्यकता असते. अपयशाने निराश न होता चिकाटीने प्रयत्न चालू ठेवल्यास यश मिळते. पॉझिट्रॉनचा शोध लावण्यासाठी,  वैश्विक किरणात पॉझिट्रॉन असण्याची शक्यता गृहीत धरून एका शास्त्रज्ञाने (बहुधा ब्लेक किंवा अँडरसन) 1920 ते 1930 या कालखंडात क्लाउडचेंबरवर वैश्विक किरणांच्या मार्‍याचे तब्बल ६०००० फोटों काढले व त्यांचे परिक्षण केले त्यात त्याला एका फोटॊत पॉझिट्रॉनचा मार्ग नोंदला गेल्याचे आढळले. एवढी चिकाटी ठेवली म्णून पॉझिट्रॉनचा शोध लागू शकला.

मायकेल्सन याने प्रकाशाचा वेग मोजला. मात्र प्रकाशाच्या संवाहनासाठी इथर नामक माध्यम असावे लागते अशी धारणा होती व या इथरचे अस्तित्व पकडण्यासाठी- समजून येण्यासाठी त्याने एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाची संकल्पना मांडली. ती मला नेहमी थक्क करून सोडते. या प्रयोगातून त्याला प्रकाशाचा वेग अचूकपणे नोंदवता आला त्याचबरोबर इथर किंवा त्यासदृश काहीही असूच शकत नाही - असते तर माझ्या उपकरणांनी त्याचे अस्तित्व पकडले असते असे तो ठामपणे सांगू शकला - त्यातून पुढे आईनस्टाईनने रिलेटिव्हिटीचा अभूतपूर्व सिद्धांत मांडला. या प्रयोगांसाठी मायकेल्सनने जी सूक्ष्म संवेदनशील उपकरणे विकसित केली होती त्यासाठी त्याला नोबेल पारितोषिक मिळाले. पण मला विचाराल तर त्याच्या प्रयोगासाठी आवश्यक कल्पनाभरारीसाठीही त्याला पारितोषक मिळायला हवे होते. अशी कल्पनाभरारीच विज्ञानाला पुढे नेऊ शकते.

माझ्या पहिल्या विज्ञानप्रयोगाविषयी तुम्हाला सांगितले.   हा प्रयोग झाल्यावर दुसर्‍या दिवशी शिक्षकांनी असाच प्रयोग पट्टीच्या सेंटीमीटरऎवजी इंचाची बाजू वापरून करावयास सांगितले. इंचाचा दहावा भाग मिलिमीटरपेक्षा कितीतरी मोठा असल्याने ठोकळ्याची बाजू मोजताना त्याची कड दोन भागचिन्हांच्या मधे येण्याची शक्यता अधिक होती अशा वेळी मधल्या मोकळ्या जागेचे काल्पनिकरीत्या दहा भाग कल्पून अंदाजे मापन (Approximation) करता येते - नव्हे तसे करायला शिकून घ्यायचे असते - हे ठसवण्यासाठी तो प्रयोग होता. या अंदाज घेण्याच्या पद्धतीचा उपयोग सामाजिक शास्त्रात सार्वमताचा कौल अजमावण्यासाठी केला जातो. तसेच तुमच्या कित्येक गणितांमधे अचूक संख्येची गरज नसून जवळपास काय उत्तर असेल तेवढा अंदाज घेऊन पुरतो - अशा वेळी आपल्याला Approximation करता यायला हवे

सर्व शोधांची जननी जिज्ञासा आहे. जिज्ञासा पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद संशोधनाला प्रेरणा देतो. कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास न ठेवता त्याचे कारण जाणून घेण्याची प्रवृत्ती, कां व कसे हे दोन प्रश्न सतत विचारत रहाणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन होय. मात्र हे कारण शोधण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करणे जरूर आहे. दुसर्‍यांच्या निष्कर्षावर अवलंबून राहू नका.

सध्या भारतात असे आढळते की पूर्वी सिद्ध झालेले प्रयोगच संशोधनासाठी बर्‍याच वेळी निवडले जातात. यात पैसा व श्रम खर्च होऊन प्रत्यक्ष नवे संशोधन होत नाही. यासाठी पुनः चाकाचा शोध लावण्याचा प्रयत्न करू नका. मायकेल्सन प्रमाणे नव्या धर्तीचे प्रयोग मांडायला शिका.

या ठिकाणी मला अजून मांडावीशी वाटते ती गोष्ट म्हणजे अध्यात्म व विज्ञान यांचा विचार. भारतीय तत्वज्ञान अध्यात्माकडे नेणारे असून त्यात वैयक्तिक अनुभूतीला महत्व दिले जाते तर  विज्ञानात वैयक्तिक अनुभूतीला स्थान नाही. म्हणजे भारतीय तत्वज्ञान किंवा अध्यात्म हे अवैज्ञानिक म्हणायचे का? यावर अधिक वाचन केल्यावर मला या दोहोतील साम्य लक्षात आले व अध्यात्मातील वैज्ञानिकता कुठे आहे तेही उमगले. ते इथे थोडक्यांत मांडणार आहे.

भगवान बुद्धाला कोणीतरी विचारले की मला तुमच्या सारखा "बोधीचा" - खर्‍या ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे. बुद्धांनी  त्याला त्याचे राहण्याचे गाव विचारले. ते सांगितल्यावर बुद्ध म्हणाले ‘तू येथून तुझ्या गावाला जाईपर्यंत  वाटेत नदी, डोंगर,  जंगल इत्यादि काय काय लागते ते सांग.’ त्याचे वर्णन ऎकल्यावर बुद्धानी त्याला प्रश्न केला की ‘ तू त्या रस्त्याने जाण्याऎवजी दुसर्‍या रस्त्याने वाटचाल केलीस तर गावापर्यंत पोचशील काय ?’ या प्रश्नाला त्या व्यक्तीने ‘नाही’ असे उत्तर दिले. तेव्हा बुद्ध म्हणाले की मी ज्ञान मिळविण्यासाठी कशी वाटचाल केली हे सांगू शकतो मात्र ज्ञान प्रत्यक्ष काय मिळाले याची अनुभूती फक्त ‘मलाच’ म्हणजे ‘जो या वाटेने जाईल त्यालाच’  होऊ शकते. मी फक्त वाट सांगू शकतो - प्रत्यक्ष बोधी तुलाच मिळवावी लागेल.

याचा अर्थ असा की अध्यात्म्यात प्रगती करण्याचा मार्ग निश्चित असतो. आधुनिक भाषेत बोलायचे तर "प्रोसेस" निश्चित असते, मात्र अनुभूती वैयक्तिक असते. विज्ञानातही प्रयोग-कृती निश्चित असते मात्र येणारे निष्कर्ष प्रत्येकाला सारखेपणाने मिळू शकतात तर अध्यात्मात ते वेगळे येऊ शकतात. तरीही प्रयोग-कृती किंवा प्रोसेस ही निश्चितपणे सारखी असून प्रत्येकाला करता येते आणि प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय सिद्धता येत नाही या दोन कारणांसाठी भारतीय तत्वज्ञान हे देखील वैज्ञानिकच आहे असे माझे मत आहे. एकूण प्रोसेसवरूनही विज्ञानप्रयोगाचे मूल्यमापन होतेच.

विज्ञानात प्रगती करण्यासाठी प्रश्न विचारा. आपली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी घटनेच्या कारणांचा शोध घ्या. त्यासाठी प्रयोग करा. प्रयोगातील पद्धतीची व निष्कर्षांची तपशीलवार नोंद ठेवा. निश्चित स्वरुपाचा निष्कर्ष मिळेपर्यंत चिकाटीने प्रयत्न करा. विज्ञानात नवे संशोधन करण्याचे, त्याचा तंत्रज्ञानात आणि इतरत्र उपयोग करण्याचे स्वप्न बाळगा.

या वर्षाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतात वैज्ञानिक क्रांती करण्याचे आपण ठरवू या.
(शब्दांकन डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली)
----------------------------------------------------------------------------------------------